उत्तर प्रदेशातल्या बलिया इथे एक विवाह केवळ वऱ्हाडी मंडळींमुळे तुटला. जेव्हा सप्तपदी सुरू होती, त्या वेळी कूलरच्या हवेवरून वऱ्हाडी मंडळींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की अखेर वधूनं विवाह न करण्याचा निर्णय घेतला. यावर नवऱ्या मुलाने वधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण वधू ऐकायला तयार नव्हती. शेवटी वर पक्षाला रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं. वधू सहमत नसल्याने लग्नाला आलेले पाहुणे आणि कुटुंबातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. पोलीस स्टेशनमध्येदेखील दोन गट एकमेकांना भिडले. मला याच मुलीशी लग्न करायचं आहे, असं वर सांगत होता; पण मला हे लग्न करायचं नाही, असं वधू सांगत होती. अखेरीस दमलेला वरपक्ष घरी परतला.
advertisement
ही घटना बुधवारी घडली. एका घरी वाजतगाजत वरात आली. कुटुंबियांनी वरातीचं स्वागत केलं. वधू-वराचा जयमाला सोहळा पार पडला. सप्तपदीची वेळ होती. तितक्यात काही जण आपापसांत भिडले. मंडपात एक कूलर ठेवला होता. काही वऱ्हाडी हवा मिळावी यासाठी तो फिरवत होते, तर काही वऱ्हाडी परत तो फिरवून आपल्या दिशेने करत होते. यावरून वाद आणि मारहाण सुरू झाली. वर जागेवर उभा राहून हा प्रकार पाहात होता. वधूला वऱ्हाडी मंडळींचं हे वर्तन न आवडल्याने तिनं विवाह मोडला. आता मला हे लग्न करायचं नाही, असं ती सांगू लागली. हे ऐकून वर निराश झाला. विवाहसोहळ्यात कधी कधी असे प्रकार होतात, असं सांगून तो तिला समजावू लागला; पण तिनं ऐकलं नाही. रात्रभर तो तिची समजूत काढत होता; पण वधूचं मन परिवर्तन झालं नाही. त्यानंतर लग्नाला आलेले पाहुणे आणि कुटुंबातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. हा सर्व प्रकार पाहून वधूनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या निर्णयावर ठाम राहिल्याने वर पक्षाला रिकाम्या हातानं घरी परतावं लागलं.
