रील स्टार भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके अपहरण व हल्ला प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. 2 दिवस उलटूनही पोलिसात गुन्हा नोंद न झाल्याने नागेश मडके आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले होते. कालपासून शहर पोलीस स्टेशन ला पाठ पुरावा करून देखील गुन्हा दाखल न करता केवळ अ दखल पात्र गुन्हा करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी पोलिसांनी सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपच मडके यांनी केला आहे.
advertisement
'त्यांचं म्हणणं आहे, बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं आहे. त्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचं सांगितलं. आम्ही सांगितलं की, मला बंदूक लावून उचलून नेलं. एक तोळ्याची सोन्याची चेन नेली. त्या दिवशी मी शुद्धीवर नव्हतो. मला दुनियाचा मार लागला होता. पोलिसांनी एनसी तक्रार दाखल करतो म्हणून सांगितलं पण आम्हाला एफआयआरच दाखल करायची आहे, अशी मागणीच मडकेंनी लावून धरली.
तसंच, 'आम्ही आधी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आता आम्ही एसपी ऑफिसला आलो होतो. पण त्यांनी काही वेळ दिला नाही. पोलीस म्हणाले की, तुम्ही बंदूक मिळवण्यासाठी न्यूज दिली, पण आम्ही असं काही केलं नाही. आम्ही अडाणी माणसं आहोत. आमच्यावर जे अत्याचार झाले, जी घटना घडली त्याची सत्य माहिती द्याला आलो होतो. जर गुन्हा दाखल झाला नाहीतर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे. नाहीतर लेकरं बाळं घेऊन आत्मदहन करणार आहे, असा इशाराच नागेश मडकेंनी दिला. पोलिसांनी मात्र, नागेश मडके यांच्या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.
काय घडलं होतं नेमकं?
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२३) साययंकाळी घडला होता. मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ले सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली आणि त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. सेल्फी काढण्यासाठी ते जवळ गेले असता, त्यांना तसंच गाडीत ओढण्यात आलं. गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली, असा आरोप मडके यांनी केला.
तर, 'ही गाडी धाराशिवकडे घेऊन जात पाच किलोमीटर अंतरावर फेकून दिलं, अपहरण करणाऱ्यांकडून मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता, असा आरोप नागेश मडके यांच्या पत्नीने केला असून पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिलं. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला हेही विशेष आहे.
