हवा थोडीशी पावसाळी झाली आणि आकाशात काळे ढग जमले की लाइट्स जातात हा अनुभव भारतात आपण सर्रास घेतो. तुम्ही खेडेगावात राहा की शहरात, हा अनुभव तुम्ही नक्की घेतला असेल. पाऊस सुरू झाला की लाइट जाणार म्हणून अनेक जण सतर्क होतात. बॅटरी, इन्व्हर्टर, मेणबत्त्या अशी तयारी करतात. कारण कधीही आणि कितीही वेळ लाइट्स जाऊ शकतात हे सगळ्यांना माहिती असतं.
advertisement
अनेकांना असं वाटतं, की पाऊस पडायला लागताच वीज विभाग कारणाशिवायच वीजपुरवठा बंद करतो किंवा विजेच्या तारा एवढ्या नाजूक असतात की पाऊस सुरू होताच त्या तुटतात आणि लाइट्स जातात; मात्र तसं नाही. पाऊस सुरू होताच लाइट्स का जातात, याचं एक खास कारण आहे. विजेच्या तारांवर ओव्हर व्होल्टेज झाल्यास लाइट्स जातात. हे ओव्हर व्होल्टेज होण्याचं कारण बहुतेक वेळा पाण्याचा थेट प्रहार हे असू शकतं. पावसाचं पाणी वेगाने येऊन विजेच्या तारांवर आपटल्यामुळे विद्युत ब्रेकर ट्रिप होतो. त्यामुळे लाइट्स जातात किंवा लाइट डिम होतात. त्याला आपण व्होल्टेज कमी झालं असं म्हणतो.
वीज विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही दोष असतील तर त्यामुळेही पावसाळ्यात लाइट्स जाऊ शकतात. या दिवसात सहसा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. काही ठिकाणी तारा उघड्या असतील तर पावसाचं पाणी जोरात येऊन त्यांच्यावर आदळताच अपघातांची शक्यता असते. त्यामुळे पावसाळी हवेत अनेकदा लाइट्स जातात. पावसाबरोबर आकाशात विजा चमकत असतील किंवा ढग गडगडत असतील, तर घरातल्या इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं. त्यामुळे लाइट्स गेलेली नसेल तरी अशा वातावरणात त्यांचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो.
