Beed: हळदीच्या दिवशीच घडलं भयंकर, दुकानाला आग अन्.., बीडमध्ये हळहळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: उद्धव लांब यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे नियोजित होता. लग्नाच्या तयारीसाठी ते गावाकडे गेले असतानाच ही घटना घडली.
बीड: संपूर्ण कुटुंब हळदी आणि लग्नाच्या तयारीत असतानाच दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना बीडमध्ये घडली. केजमधील शिक्षक कॉलनी परिसरातील एका प्लंबिंग साहित्याच्या दुकानाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, या दुकानाचे मालक असलेले उद्धव अंगद लांब यांचा त्याच दिवशी हळदीचा कार्यक्रम होता आणि दुसऱ्या दिवशी विवाह पार पडणार होता. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे कर्मचारी नियमित गस्त घालत असताना शिक्षक कॉलनीकडून धुराचे लोट उठताना दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन जवळपास एक तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा संपूर्ण बाजारपेठ धोक्यात आली असती.
advertisement
या आगीत दुकानातील पाईप्स, पाण्याच्या टाक्या, सॅनिटरी वेअर, फर्निचर तसेच इतर महागडे प्लंबिंग साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्यवसायावरच अवलंबून असलेल्या उद्धव लांब यांच्यासाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे.
advertisement
उद्धव लांब यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे नियोजित होता. लग्नाच्या तयारीसाठी ते गावाकडे गेले असतानाच केजमधील दुकानाला आग लागल्याची बातमी त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच ते हळदीच्या अंगानेच केजकडे रवाना झाले. आनंदाचे क्षण सोडून आगीत जळालेल्या दुकानाकडे पाहताना त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, आगीचे स्वरूप संशयास्पद असल्याचे उद्धव लांब यांनी सांगितले आहे. नैसर्गिक कारणांपेक्षा घातपाताची शक्यता अधिक असल्याचा त्यांचा संशय असून, याबाबत ते केज पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल करणार आहेत. लग्न पार पडले असले तरी या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 9:59 AM IST









