Jalna Rain: अवकाळी पावसाचं थैमान, जालन्यात नदी-नाल्यांना पूर, शेतीच गेली वाहून!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna Rain: मराठवाड्यात झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. जालन्यात मुसळधार पाऊस आला असून अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याची स्थिती आहे.
जालना: राज्यासह मराठवाड्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. जालना जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस होत आहे. अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर या तालुक्यांमध्ये तसेच बदनापूरमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळालं. तसेच ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. मंठा तालुक्यातील तळणी येथे ओढ्यात वाहून जाणाऱ्या एका युवकाला वाचवण्यात यश आलंय. लोकल18 च्या माध्यमातून एकंदर स्थितीचा आढावा घेऊ.
द्राक्ष बागा पाण्यात
जालना जिल्ह्यातील अंभोरेवाडी परिसरामध्ये द्राक्ष बागांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं असून यामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांच्या प्रकोपांची शक्यता आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला मे महिन्यातच पूर आला आहे. गोलापांगरी शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदी तुडुंब भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
मंदिरावर कोसळली वीज
जालना जिल्ह्यातील पानेवाडी येथील महादेवाच्या मंदिरावर वीज कोसळ्याची घटना देखील घडली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून पुलावरून नागरिक धोकादायक वाहतूक करत आहेत. राजेगाव येथे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असून यामुळे आसपासच्या अनेक क्षेत्रांमध्ये पाणी शिरले आहे. तर शेतजमिनीचे देखील मोठे नुकसान झालेय.
advertisement
माती वाहून गेली
“रात्री झालेल्या पावसाने शेतामध्ये खूप नुकसान झाला आहे. अवकाळी पावसाने शेतामध्ये पाणी शिरले. यामुळे जमीन खरडून गेली. पाण्याच्या प्रवाहाने शेताचे वळण फुटले. शेतामध्ये खडक उघडा पडलाय. त्यामुळे शेती पिकने कठीण आहे. राजेगाव घनसावंगी रस्त्यावर पुलावरून वाहणारे पाणी शेतामध्ये शिरते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी व मोठ्या पुलाचं बांधकाम करावं,” अशी मागणी शेतकरी भरत उगले यांनी केलीये.
advertisement
दरम्यान वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही ठिकाणी नदीवरील जुने पूल वाहून गेल्याने देखील मोठ्या अडचणीची स्थिती निर्माण झालीये.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 28, 2025 6:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Rain: अवकाळी पावसाचं थैमान, जालन्यात नदी-नाल्यांना पूर, शेतीच गेली वाहून!






