2 महिन्यांत 56000 रुपयांनी वाढलं सोनं, 31 डिसेंबरपर्यंत किती असेल दर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जागतिक घडामोडींमुळे IBJA नुसार सोन्याचा दर १.३६ लाख तर चांदी २.११ लाख रुपयांवर पोहोचली. नाशिकमध्येही दरवाढ, तज्ज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला.
advertisement
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, केवळ डिसेंबर या एकाच महिन्यात सोन्याच्या किमतीत ९,६९२ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्यासोबतच चांदीनेही ऐतिहासिक भरारी घेतली असून, चांदीचा दर प्रति किलो २.११ लाख रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, एकट्या डिसेंबर महिन्यात चांदी तब्बल ४६,६४१ रुपयांनी महागली आहे.
advertisement
सोन्याच्या किमतीतील ही तेजी दिवाळीच्या काळापासून सातत्याने वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात एकूण ५८,८७३ रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे. १८ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर प्रति तोळा ७८,२१४ रुपये होता, जो अवघ्या काही दिवसांत म्हणजे २७ ऑक्टोबरपर्यंत थेट १.२१ लाखांवर जाऊन पोहोचला. त्यानंतरच्या काळात बाजारपेठेत किमतींमध्ये सतत अस्थिरता पाहायला मिळाली आहे.
advertisement
सोन्याबरोबरच चांदीनेही डिसेंबरमध्ये मोठी झेप घेतली आहे. एका महिन्यात चांदी तब्बल ८५ हजार ६७९ रुपयांनी महागली आहे. बाजारातील ही हालचाल अचानक नाही, तर जागतिक घडामोडींचा त्यावर थेट परिणाम दिसून येतो. अमेरिकेचे धोरण, डॉलरमधील कमजोरी आणि जागतिक स्तरावरची अस्थिरता यामुळे सोने आणि चांदी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून समोर येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
नाशिकसारख्या शहरांमध्येही या दरवाढीचा स्पष्ट परिणाम जाणवत आहे. २१ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचला असून चांदीचा दर प्रति किलो २ लाख १४ हजार रुपये इतका आहे. बाजारातील व्यापारी आणि गुंतवणूकदार नववर्षाकडे आशेने पाहत असून पुढील काही आठवड्यांत या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर 31 पर्यंत सोन्याचा भाव १ लाख ४० ते ४५ हजार तर चांदीचा भाव २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत जाण्याचे संकेत आहेत. महागाई, युद्धसदृश परिस्थिती आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने पुन्हा एकदा अत्यंत विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर येत आहे. मात्र, भावनांवर नव्हे तर दीर्घकालीन विचार करूनच गुंतवणूक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.








