आषाढीची वाट बघू नका, आधीच साजरी करा यात्रा, ‘या’ मंदिर प्रशासनाचे आवाहन
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
यंदा कोल्हापुरातल्या टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवी मंदिर प्रशासनाने याआधीच यात्रा साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा भाविकांना दोन ऐवजी चार मंगळवार आणि शुक्रवार त्र्यंबोली यात्रेसाठी मिळणार आहेत.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : पावसाळ्याच्या सुरुवातीला कोल्हापुरकरांना वेध लागतात ते आषाढात साजऱ्या केल्या जाणाऱ्या त्र्यंबोली यात्रेचे. आषाढी एकादशी आणि गुरू पौर्णिमा झाल्यानंतरच कोल्हापूरकर ही त्र्यंबोली देवीची यात्रा करत असतात. मात्र यंदा कोल्हापुरातल्या टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवी मंदिर प्रशासनाने याआधीच यात्रा साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा भाविकांना दोन ऐवजी चार मंगळवार आणि शुक्रवार त्र्यंबोली यात्रेसाठी मिळणार आहेत.
advertisement
पावसाळ्यात नदीमध्ये वाढणाऱ्या नव्या पाण्याची पूजा या त्र्यंबोली यात्रेवेळी केली जात असते. 'पी ढबाक' अर्थात छोटी सनई आणि डफ यांचा ठेका, प्रसादाचे वाटे आणि शहरातील विविध भागांतून नदीच्या नव्या पाण्यासह निघणाऱ्या मिरवणुका असे वातावरण या निमित्ताने आषाढ महिन्यात दरवर्षी कोल्हापुरात पाहायला मिळत असते. मात्र आषाढ महिन्यात दर मंगळवार आणि शुक्रवारी ही यात्रा केली जात असली, तरी दरवर्षी कित्येक भाविक आषाढी एकादशी आणि गुरू पौर्णिमा झाल्यानंतरच यात्रेची सुरुवात करत असतात. त्यामुळे शेवटच्या दोन मंगळवारी आणि दोन शक्रवारी त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे फक्त शेवटच्या दोन मंगळवारी आणि दोन शक्रवारी ऐवजी आषाढ महिन्यात चारही मंगळवारी आणि शुक्रवारी त्र्यंबोली यात्रा करावी असे आवाहन मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.
advertisement
का केले आहे आवाहन?
आषाढ महिन्यातील फक्त शेवटच्या दोन मंगळवार आणि शुक्रवारी भाविक मंदिर परिसरात यात्रेसाठी येत असल्यामुळे याच दिवसात मंदिरात अलोट गर्दी होत असते. अशी गर्दी टाळण्यासाठीच नागरिकांना हे आवाहन करण्यात आले आहे.
कोरडा शिधा देण्याचेही आवाहन
या त्र्यंबोली देवीच्या आंबील यात्रेवेळी बरेचसे भाविक देवीला नदीहून आणलेले नवीन पाणी वाहून नैवेद्य दाखवत असतात. पण जास्त प्रमाणात भाविकांकडून नैवेद्य अर्पण केल्यामुळे पावसाळी वातावरणात अन्नाची भरपूर नासाडी होत असते. हीच अन्नाची नासाडी टाळण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी असलेल्या दिवशी कोरडा शिधा अर्पण करावा, असेही मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान आषाढ महिन्यात या त्र्यंबोली देवीच्या आंबील यात्रेला दरवर्षी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या आवाहनानुसार आषाढ महिना सुरू झाल्यानंतर 9, 12, 16, 19, 23, 26, 30 जुलै आणि 2 ऑगस्ट या दिवसांना भाविकांनी त्र्यंबोली यात्रा करावी. जेणेकरून कोल्हापुरातल्या टेंबलाईवाडीच्या टेकडीवर गर्दीचे नियोजन मंदिर व्यवस्थापनाला करता येईल.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
June 29, 2024 6:04 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
आषाढीची वाट बघू नका, आधीच साजरी करा यात्रा, ‘या’ मंदिर प्रशासनाचे आवाहन