advertisement

Agriculture News : शेतीत अपयश का येते? कोणत्या होतात व्यावसायिक चुका, कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, Video

Last Updated:

शेतीकडे आजही अनेक शेतकरी केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहतात, व्यवसाय म्हणून नाही. हीच मानसिकता शेतीतील अपयशाचे मूळ कारण ठरत आहे.

+
News18

News18

बीड : शेतीकडे आजही अनेक शेतकरी केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहतात, व्यवसाय म्हणून नाही. हीच मानसिकता शेतीतील अपयशाचे मूळ कारण ठरत आहे. बदलत्या काळात शेती ही नियोजन, गुंतवणूक आणि बाजारपेठेवर आधारित असलेली एक संपूर्ण व्यवसाय प्रणाली बनली आहे. मात्र पारंपरिक पद्धती, जुने अनुभव आणि अंदाजावर आधारित निर्णय घेतल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेती व्यवसाय म्हणून स्वीकारला नाही, तर वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. याबद्दलच कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी माहिती दिली आहे.
पीक निवड करताना बाजारपेठेचा अभ्यास न करणे ही मोठी चूक ठरते. कोणत्या पिकाला किती मागणी आहे, भविष्यात दर कसे राहतील, साठवण क्षमता किती आहे याचा विचार न करता पेरणी केली जाते. परिणामी उत्पादन तयार झाल्यावर बाजारात भाव पडलेले असतात. यासोबतच उत्पादन खर्चाचा अचूक हिशोब न ठेवणे, अपेक्षित उत्पन्नाचा अंदाज न बांधणे आणि नफा-तोट्याचे विश्लेषण न करणे यामुळे शेती तोट्यात जाते. खर्च नियंत्रण नसेल, तर जास्त उत्पादन असूनही फायदा होत नाही.
advertisement
तांत्रिक बाबींमध्येही अनेक चुका होतात. माती परीक्षण न करता खतांचा अति किंवा अपुरा वापर, पाण्याचे चुकीचे नियोजन आणि हवामान बदलांचा अंदाज न घेणे यामुळे उत्पादनात घट येते. आधुनिक शेतीत हवामान, माती आणि पिकांची गरज यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक शेतकरी नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, ड्रिप सिंचन किंवा स्मार्ट शेती पद्धती स्वीकारण्यास टाळाटाळ करतात. परिणामी कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेत ते मागे पडतात.
advertisement
व्यावसायिक शेतीत उत्पादनाइतकेच महत्त्व मार्केटिंग आणि विक्रीला असते, मात्र येथेच मोठी अडचण दिसून येते. शेतमालाची साठवण, ग्रेडिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगकडे दुर्लक्ष केल्याने माल कमी दरात विकावा लागतो. दलालांवर पूर्ण अवलंबून राहणे, थेट विक्रीचे पर्याय न वापरणे आणि बाजारभावाची माहिती वेळेवर न घेणे यामुळे शेतकऱ्यांचा नफा कमी होतो. योग्य बाजारपेठ निवडली नाही, तर मेहनतीचे योग्य मूल्य मिळत नाही.
advertisement
याशिवाय शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, आंतरपीक, पशुपालन किंवा मूल्यवर्धन यांसारख्या उत्पन्न वाढवणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष केले जाते. शेतीला व्यवसाय म्हणून पाहून योग्य नियोजन, बाजाराभिमुख विचार आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली, तर अपयश टाळता येऊ शकते. आधुनिक शेती ही केवळ पिके घेण्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण आर्थिक व्यवस्थापनाची कला बनली असून, ती स्वीकारल्यास शेतकरी नफ्याकडे निश्चितच वाटचाल करू शकतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतीत अपयश का येते? कोणत्या होतात व्यावसायिक चुका, कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement