महाडीबीटीने शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती का बंद केली? कृषी विभागाने दिली माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांचा कणा मानल्या जाणाऱ्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांचा कणा मानल्या जाणाऱ्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज पुढील टप्प्यावर अडकून पडले असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाकडून सातत्याने शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर केले, आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आणि तपासणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली. मात्र, अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली पूर्वसंमतीच उपलब्ध नसल्याने संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे.
advertisement
सध्याच्या स्थितीत महाडीबीटी पोर्टलवर हजारो अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अर्जदार शेतकऱ्यांनी सर्व औपचारिकता पूर्ण करूनही केवळ एका निर्णयाअभावी लाभापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, केवळ शेतकरीच नव्हे तर तालुका आणि जिल्हा स्तरावरील कृषी अधिकारीही या परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. अर्ज तपासणी पूर्ण असूनही पुढील कार्यवाही करता येत नसल्याने अधिकारी वर्गालाही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर देता येत नाही.
advertisement
अडचण का निर्माण झाली?
कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही अडचण मुख्यतः निधीच्या कमतरतेमुळे निर्माण झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवजारे, यंत्रसामग्री यांसारख्या सुविधांसाठी अनुदान दिले जाते. मात्र सध्या या योजनांसाठी उपलब्ध निधी अपुरा पडत असल्याचे सांगितले जात आहे. अतिरिक्त आर्थिक दायित्व निर्माण होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पूर्वसंमती प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत व स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही, ही बाब शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेत भर घालत आहे.
advertisement
कृषी विभागाचे आवाहन
पूर्वसंमती बंद असल्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. काही शेतकऱ्यांनी आधीच यंत्र खरेदीची तयारी केली होती, तर काहींनी खरेदीचे व्यवहार सुरूही केले आहेत. मात्र पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास पुढे अनुदान मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या कोणतीही घाई न करता अधिकृत पूर्वसंमती मिळेपर्यंत थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 8:27 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
महाडीबीटीने शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती का बंद केली? कृषी विभागाने दिली माहिती










