नाशिकमध्ये राहणाऱ्या निलेशने त्याच शहरात शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने नोकरी देखील सुरू केली. पण, नोकरीमध्ये त्याचं मन रमत नव्हतं. नोकरी करून इतरांसाठी बांधील राहण्यापेक्षा आपण स्वतःचा काही तरी व्यवसाय करावा, असा त्याच्या मनात विचार होता. हाच विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. यासोबत त्याने पिण्याच्या पाण्याचा प्लँट देखील सुरू केला. पण, व्यवसायात नवीन असल्याने त्याला अनेक अडचणी आल्या. शिवाय, कोरोना महामारीमुळे त्याच्या व्यवसायाला आणखी फटका बसला. त्यामुळे निलेशला आपले दोन्ही व्यवसाय बंद करावे लागले.
advertisement
Farmer Success Story: शेतकऱ्याची भारीच शेती, उसात घेतलं आंतरपीक, कमाई लाखात!
कोरोना संपल्यानंतर निलेश पुन्हा जिद्दीने उभा राहिला. यावेळी त्याने पाणीपुरीची गाडी सुरू केली. या व्यवसायात देखील त्याला अनेक अडचणी आल्या. खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायाचा अनुभव नसल्याने नुकसान देखील झालं. पण, निलेशने माघार घेतली नाही. याच व्यवसायातून त्याने नाशिकमध्ये 'जय शंकर चाट' या नावाने स्वतःचं दुकान देखील सुरू केलं आहे. त्याच्या दुकानातील दही पुरी संपूर्ण नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे.
सध्या निलेश चाटविक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई करतो. शिवाय, त्याच्या व्यवसायामुळे इतरांना देखील रोजगार मिळत आहे. तुम्हाला देखील नाशिकमध्ये दहीपुरी खायची असेल तर पंचवटी परिसरातील इंद्रकुंड पंचवटी कारंज्याजवळ निलेशचं चाट सेंटर आहे.