मुंबई : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून नववर्षाच्या सुरुवातीलाच बाजारभावात चढ-उतार दिसून येत आहेत. १ जानेवारी २०२६ रोजी सोयाबीनची मोठी आवक नोंदवली गेली. मात्र वाढत्या आवकेच्या तुलनेत अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानासोबतच काही प्रमाणात नाराजीही दिसून येत आहे.
advertisement
आजचे दर काय?
नागपूर बाजार समितीत १ जानेवारी रोजी लोकल सोयाबीनची ४०५ क्विंटल आवक झाली. येथे किमान दर ४४०० रुपये, कमाल दर ४९०० रुपये तर सरासरी दर ४७७५ रुपये नोंदवला गेला.
३१ डिसेंबरचे दर काय?
अमरावती बाजारात तब्बल ५३३४ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर ४५०० रुपये राहिला. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक १६,७८३ क्विंटल आवक झाली असून येथे सरासरी दर ४८०० रुपये मिळाला, जो शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक मानला जात आहे.
लासलगाव आणि लासलगाव-विंचूर या कांदा बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार समित्यांमध्येही सोयाबीनची मोठी आवक दिसून आली. लासलगावमध्ये ५४३ क्विंटल आवक असून सरासरी दर ४७६० रुपये राहिला, तर लासलगाव-विंचूर येथे ४८५ क्विंटल आवकेसह सरासरी दर ४७०० रुपये नोंदवण्यात आला. येवला बाजारात मात्र केवळ ३५ क्विंटल आवक झाली असून येथे सरासरी दर ४३९९ रुपये इतकाच राहिला.
मराठवाड्यातील माजलगाव (१२५७ क्विंटल), रिसोड (१७८० क्विंटल), हिंगोली (१००५ क्विंटल) आणि परभणी यांसारख्या बाजारांतही सोयाबीनची चांगली आवक झाली. माजलगावमध्ये सरासरी दर ४६३१ रुपये, रिसोडमध्ये ४५०० रुपये तर हिंगोलीत ४५७५ रुपये मिळाले. छत्रपती संभाजीनगर बाजारात आवक कमी असली तरी सरासरी दर ४६७१ रुपये राहिला.
विदर्भातील काही बाजारांत मात्र उच्चांकी दर पाहायला मिळाले. सांगली बाजारात लोकल सोयाबीनला ५५०० रुपयांचा कमाल दर मिळाला असून सरासरी दर ५२५० रुपये नोंदवला गेला. वाशीम बाजारात पिवळ्या सोयाबीनला तब्बल ६०५० रुपयांचा कमाल दर मिळत सरासरी दर ५८५० रुपये राहिला. तसेच खामगाव (सरासरी ५४१२ रुपये) आणि मलकापूर ५३७५ रुपये या बाजारांतही चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
