कोकणात पावसाचा जोर
कोकण विभागात पावसाचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो. ताशी सुमारे 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मत्स्यव्यवसायिकांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरू शकतात. त्यामुळे पूरस्थितीचा धोका संभवतो. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत गडगडाटासह तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ढगाळ वातावरण राहील, तसेच पिकांना अतिरिक्त पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भात, मका, भाजीपाला आणि ऊस यांसारख्या पिकांना फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना कराव्यात:
पाणी साचू देऊ नये
शेतात किंवा पिकांच्या आसपास पाणी साचल्यास मुळे कुजण्याचा धोका वाढतो. पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पाणी निचरा करण्याची योग्य सोय करावी.
किडी आणि रोगांवर नियंत्रण
सतत ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सोयाबीन, भात आणि डाळीवर्गीय पिकांवर पाने वाकरणे, करपा, पानांवर ठिपके असे रोग दिसू शकतात.
यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब (2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांसारखी फवारणी करावी.
भात पिकासाठी उपाय
भात शेतात पाणी जास्त साचल्यास फुलोऱ्याला आणि मुळांना नुकसान होते. त्यामुळे पाण्याची पातळी 5-7 सें.मी. पेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी घ्यावी.
भाजीपाला आणि ऊस पिके
वांगी, टोमॅटो, मिरची यांसारख्या पिकांवर फळकुज रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी कॉप्पर ऑक्सिक्लोराईड किंवा मॅन्कोझेब फवारावे. उसामध्ये पाणी साचू देऊ नये. मुळांच्या कुजण्याचा धोका असल्याने जलनिचऱ्याची सोय करावी.
जैविक उपाय
रासायनिक फवारणीसोबत त्रायकोडर्मा, प्सुडोमोनास यांसारखे जैविक घटक जमिनीत टाकल्यास रोगप्रतिकारकता वाढते.
दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर असेल, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल. शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल आणि खरीप हंगामावर होणारा परिणाम कमी करता येईल.