बीड - सीझनमध्ये अनेक शेतकरी सिताफळ पिकाचे माध्यमातून अगदी चांगली कमाई करत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून सीताफळाची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. कारण एकदा केली लागवड ही पुढील काही वर्षांसाठी कायम टिकून राहते.
मागील 2 ते 3 वर्षांपासून शेतीमध्ये सिताफळ लागवडीचे महत्त्व वाढलेले आहे. आज आपण अशाच एका सीताफळ उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. श्रीराम जोशी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बीड येथील रहिवासी असून मागील 5 वर्षांपासून सीताफळाच्या माध्यमातून अगदी चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
श्रीराम जोशी हे एका साखर कारखान्यात कामगार म्हणून नोकरी करतात. तसेच ते आधी शेतीमध्ये पारंपारिक पिकांची लागवड करायचे. परंतु त्यांना त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी कल्पनेवर जोर देऊन शेतीसोबत जोड व्यवसाय करण्यासारखे कोणते पीक घेता येईल, याबद्दल विचार केला. शेती सोबतच काहीतरी जोड व्यवसाय करावा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांवर भेटी देऊन ते पिकांची माहिती घ्यायचे.
कालांतराने सिताफळ या पिकाबद्दल त्यांना कल्पना सुचली. त्यांना सीताफळ लागवडीचे महत्त्व समजले आणि त्यांनी सीताफळांची लागवड करण्याचे ठरवले. कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने त्यांनी दीड एकरमध्ये सीताफळची लागवड केली. या दीड एकर मध्ये लागवड केलेल्या सिताफळच्या माध्यमातून 5 ते 6 लाख रुपये कमाई होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिताफळ हे प्रत्येकाला आवडणारे फळ आहे. सद्यस्थितीला बाजारामध्ये देखील सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सीताफळ हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे देखील म्हटले जाते. कारण सीताफळाचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत.