हवामान स्थिती काय?
पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वायव्य दिशेने सरकत अधिक तीव्र होत आहे. या प्रणालीला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉन्सूनचा सक्रिय पट्टा जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे.
advertisement
ईशान्य अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या सरी सुरू राहिल्या.
आजचा अंदाज
आज (ता. ६ सप्टेंबर) पालघर, नंदूरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरी आणि पावसाची उघडीप राहील, असा अंदाज आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
पालघर, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा.
शेतकऱ्यांसाठी सूचना
हवामानातील या बदलाचा थेट परिणाम पिकांवर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजना कराव्यात.
सोयाबीन पिकासाठी – कीड व रोग नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थायमेथोक्झाम यांसारख्या कीटकनाशकांची शिफारस केली जाते. पाने पिवळी पडणे, पाने कुरतडणे यासाठी ही फवारणी उपयुक्त ठरेल.
कापूस पिकासाठी – तुडतुडे, बोंडअळी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रोफेनोफॉस, असेटामिप्रिड किंवा क्लोरपायरीफॉस यांचा वापर करता येईल.
भात पिकासाठी – पानांवर डाग पडणे (ब्लास्ट रोग) किंवा कीड नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल किंवा कर्बेन्डाझिम मिश्रणाची फवारणी करावी.
डाळींची पिके – शेंगा पोखरणाऱ्या अळ्या आढळल्यास स्पिनोसेड किंवा इंडोक्साकार्ब यांची फवारणी करावी.
तसेच सततचा पाऊस असल्याने कीटकनाशकांची फवारणी सकाळी किंवा पाऊस थांबल्यानंतर करावी. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात औषधांचा वापर टाळावा.