१२ वाजेपर्यंत वाट पाहू नंतर रेल्वे रोखू, बच्चू कडूंचा इशारा
बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आम्ही चर्चेला तयार आहोत, पण सरकारनेच चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत. आज दुपारी १२ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. जर सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन सुरू करू.”
advertisement
कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्याही नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर उतरून भव्य मोर्चा काढला आहे. आंदोलनात प्रहार कार्यकर्त्यांनी चार मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर नाकेबंदी केली आहे, ज्यामुळे वाहनचालकांना प्रचंड गैरसोय होत आहे.
रात्री महामार्गावरच ठिय्या आंदोलन
काल (२८ ऑक्टोबर) च्या रात्री बच्चू कडू आणि शेकडो आंदोलकांनी जामठा येथील महामार्गावरच मुक्काम केला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शेतकरी नागपूरमध्ये जमा होत आहेत. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या कोणत्या?
१) कोणत्याही अटीशर्तीशिवाय शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
२) वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
३) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रति टन ४,३०० रुपये एफआरपी द्यावी.
४) कांद्याला किमान प्रति किलो ४० रुपये दर मिळावा.
५) कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य आणि निर्यात कर कायमस्वरूपी रद्द करावा.
६) गायीच्या दुधाला किमान ५० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६५ रुपये दर जाहीर करावा.
