भंडारा : जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते जागतिक पातळीवर दखल घेतला जाणारा एआय उद्योजक असा प्रवास करणाऱ्या प्रशांत मिश्रा यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नागपूरस्थित प्रशांत मिश्रा यांनी स्थापन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित अॅग्रीटेक कंपनीमुळे शेती क्षेत्रात लक्षणीय बदल घडताना दिसत आहेत. त्यांच्या कार्याची थेट दखल मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर घेतल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.
advertisement
22 फुट उंच उस पिकवला
प्रशांत मिश्रा यांनी स्थापन केलेल्या ‘अॅग्रीपायलट.एआय’ या कंपनीने विकसित केलेल्या एआय अल्गोरिदमचा वापर करून बारामती परिसरातील शेतकऱ्यांच्या एका गटाने तब्बल 22 फूट उंच ऊस पिकवण्यात यश मिळवले आहे. सामान्यतः ऊसाचे पीक 10 ते 12 फूट उंचीपर्यंत वाढते. मात्र एआय-आधारित पद्धतीने शेती व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, खतांचा अचूक वापर आणि पिकाच्या वाढीचे बारकाईने निरीक्षण केल्यामुळे हे अभूतपूर्व यश साध्य झाले आहे. या प्रयोगामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे नवे किरण निर्माण झाले आहेत.
सत्या नाडेला, एलोन मस्ककडून व्हिडिओ रिपोस्ट
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या एआय-आधारित शेती प्रयोगाचे कौतुक केले आहे. या व्हिडिओत पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन कसे बदलत आहे, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. नाडेला यांनी हा उपक्रम “कृषी क्षेत्रातील एआयच्या प्रभावाचे उत्कृष्ट उदाहरण” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी शेतीत रसायनांचा मर्यादित वापर, पाण्याची बचत आणि उत्पादनात झालेली लक्षणीय वाढ याकडे विशेष लक्ष वेधले. हे आकडे पाहून आपण तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभाव कसा दिसतो, हे समजते, असेही त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, सत्या नाडेला यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांनीही ‘एक्स’वर रीपोस्ट केला. मस्क यांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रशांत मिश्रा आणि त्यांच्या कंपनीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसारख्या पारंपरिक क्षेत्रात बदल घडवता येतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.
आयटी क्षेत्रात मोठी भरारी
प्रशांत मिश्रा यांचा उद्योजकीय प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी सुरुवातीला नागपूरच्या आयटी पार्कमध्ये ‘क्लिक2क्लाउड’ या आयटी कंपनीची स्थापना केली. त्यानंतर ही कंपनी मिहान-सेझमध्ये स्थलांतरित झाली. पुढे कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे काम करण्याच्या उद्देशाने ‘अॅग्रीपायलट’ ही अॅग्रीटेक कंपनी मूळ कंपनीपासून वेगळी करण्यात आली. आज या कंपनीची युनिट्स परदेशातही कार्यरत असून जागतिक बाजारपेठेत ती आपला ठसा उमटवत आहे.
आज प्रशांत मिश्रा यांचे कार्य केवळ एका यशस्वी स्टार्टअपपुरते मर्यादित न राहता, भारतीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, खर्च कमी करणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे, या दिशेने त्यांचा एआय-आधारित प्रयोग भविष्यातील शेतीसाठी नवा मार्ग दाखवणारा ठरणार आहे.
