राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीची गरज
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामानातील बदलामुळे पारंपरिक पद्धतीची शेती अधिक जोखमीची बनत आहे. त्यामुळे कृषी संशोधन संस्थांनी बदलत्या वातावरणात टिकून राहणारी आणि स्थिर उत्पादन देणारी नवीन पीकवाणे विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि हवामानानुसार शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
advertisement
कर्जमाफी तात्पुरता उपाय
यावेळी बोलताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तात्पुरती उपाययोजना असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो; मात्र शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त व्हावेत यासाठी शाश्वत शेती पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.
या संदर्भात कृषी संशोधक आणि कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हवामान बदलाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि टिकाऊ शेती मॉडेल विकसित करण्याची जबाबदारी कृषी संशोधन संस्थांवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर
यापूर्वीच्या काळात सरकारचा दृष्टिकोन कृषी क्षेत्राकडे प्रामुख्याने ‘रिलीफ’ आणि ‘रिहॅबिलिटेशन’पुरता मर्यादित होता. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मदत देणे एवढीच भूमिका घेतली जात होती, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मात्र सध्याच्या सरकारने कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून शेती अधिक सक्षम करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन, तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून शेती अधिक टिकाऊ आणि नफ्याची बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
