मुंबई : यशस्वी होण्यासाठी मोठी पार्श्वभूमी किंवा भांडवलच लागते असे नाही, तर गरज असते ती केवळ जिद्द, मेहनत आणि योग्य दिशेने घेतलेल्या निर्णयांची. हीच बाब ज्ञानेश्वर भोडके यांच्या जीवनकथेतून स्पष्टपणे दिसून येते. अत्यंत साध्या परिस्थितीतून वाटचाल करत, आज ते एकात्मिक शेती व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
सामान्य कुटुंबात झाला जन्म
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानेश्वर बोडके यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या शोधात पुणे गाठले. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने त्यांना ऑफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली. या नोकरीमुळे घरखर्च भागवता येत असला, तरी त्यांच्या मनात मोठी स्वप्ने होती. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करूनही मिळणारे वेतन अत्यंत तुटपुंजे होते. मात्र, परिस्थितीशी तडजोड न करता त्यांनी सतत काहीतरी वेगळे करण्याचा विचार सुरू ठेवला.
पेपर वाचताना सुचली आयडिया
याच काळात एका पेपरमध्ये त्यांनी आधुनिक शेतीवरील यशोगाथा वाचली. अवघ्या 1000 चौरस फूट क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून एका शेतकऱ्याने लाखोंचे उत्पन्न मिळवल्याची माहिती वाचून ज्ञानेश्वर यांना नवी दिशा मिळाली. त्यांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि पॉलीहाऊस शेतीबाबत सखोल माहिती मिळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक गोष्टी स्पष्ट नव्हत्या, मात्र त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशिक्षण घेण्याचा मार्ग निवडला.
1999 साली शेतीची सुरुवात
योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर ज्ञानेश्वर यांनी सुमारे 1000 चौरस फूट क्षेत्रात स्वतःचे पॉलीहाऊस उभारले. 1999 साली त्यांनी कार्नेशन आणि गुलाब फुलांची लागवड सुरू केली. उत्पादनाची गुणवत्ता आणि सातत्य यामुळे अल्पावधीतच त्यांच्या फुलांना मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढली. अवघ्या एका वर्षात त्यांनी घेतलेले सुमारे 10 लाख रुपयांचे कर्ज पूर्णपणे फेडले आणि आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
आज ज्ञानेश्वर बोडके यांचा शेती व्यवसाय केवळ फुलांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ते केळी, संत्री, आंबा, पपई, गोड लिंबू, अंजीर, सीताफळ तसेच विविध हंगामी आणि हंगामाबाहेरील भाज्यांची लागवड करत आहेत. यासोबतच त्यांनी दूध पुरवठा व्यवसायही सुरू केला असून, शहरातील ग्राहकांच्या घरी पॅकेटमध्ये दूध पोहोचवले जाते.
स्वतंत्र अॅप तयार केला
बदलत्या काळाची गरज ओळखत ज्ञानेश्वर यांनी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर सुरू केला आहे. ग्राहकांसाठी स्वतंत्र अॅप तयार करून त्याद्वारे थेट ऑर्डर आणि घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक विस्तारला आहे.
अभिनव फार्मिंग क्लबची स्थापना
याशिवाय त्यांनी ‘अभिनव फार्मिंग क्लब’ या नावाने शेतकऱ्यांचा गट स्थापन केला आहे. सध्या या गटाशी 300 हून अधिक शेतकरी जोडलेले असून, प्रत्येक शेतकरी वार्षिक 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.
