जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिहा हे एक छोटे खेडेगाव. अरुण सोनवणे हे या गावातील साडेचार एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी. निसर्गाच्या दृष्टचक्रांनी आधीच शेतकरी पिचून गेला आहे. त्यातच मुलीच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च झाल्याने आधीच कर्जबाजारी झालेल्या अरुण सोनवणे यांची तब्बल सव्वा लाख रुपये किंमतीची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेली.
advertisement
या गोष्टीची पारद पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार देखील दाखल केली. परंतु अनेक दिवस झाले बैलजोडीचा शोध लागत नाही. मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे. शेतीची मशागत बाकी आहे. बैलजोडी तर चोरीला गेली आहे. मग करायचे काय? आधीच कर्जबाजारी असल्याने कर्ज घेऊन मशागत करणे परवडणार नाही. त्यामुळे त्यांनी आपली पत्नी आणि स्वतः वखराला जुंपून शेतीची मशागत सुरू केली आहे.
अरुण सोनवणे यांना एक मुलगा देखील आहे. त्याचे शिक्षण सुरू आहे. मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न, शेतीची मशागत आणि चोरी गेलेली बैलजोडी अशा दृष्टचक्रात सोनवणे कुटुंब अडकले. त्यामुळेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच वखराला जुंपून शेताची मशागत करणे योग्य समजले. एक तर पोलिसांनी बैलजोडीचा शोध लावावा किंवा प्रशासनाने आम्हाला मशागतीसाठी बैलजोडी द्यावी, अशी मागणी करून सोनवणे यांनी सरकारकडे केली आहे.





