छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्याच्या शेती इतिहासात मैलाचा दगड ठरलेला क्षण अखेर साकार झाला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर असलेले कर्जाचे ओझे उतरल्याने रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेतील 14 गावांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 25 मार्च 2025 रोजी 63 कोटी 67 लाख रुपयांच्या अंतिम कर्जमाफीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याने पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संघर्षाचा शेवट झाला आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला.
advertisement
काय होती योजना?
रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना 1991-92 या काळात सुरू झाली. या योजनेचा उद्देश वैजापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला सिंचनाची हमी देणे हा होता. सुरुवातीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज घेऊन योजना राबवण्यात आली. या प्रक्रियेत सुरुवातीला सुमारे 34 कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. मात्र पुढील काळात जायकवाडी धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्यात आल्याने, तसेच नियोजनातील त्रुटी आणि भ्रष्टाचारामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना अर्धवट अवस्थेतच बंद पडली.
210 कोटींचे कर्ज
योजनेचा अपेक्षित लाभ न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकले. कालांतराने व्याज वाढत गेले आणि एकूण कर्जाचा डोंगर तब्बल 210 कोटी रुपयांवर पोहोचला. यामध्ये 14 गावांतील 2 हजार 117 शेतकरी अडकले होते. अनेक वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर होता.
अखेर 18 जून 2014 रोजी राज्य शासनाने या योजनेतील थकीत मुद्दल रकमेची, म्हणजेच 64 कोटी 26 लाख 59 हजार रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र व्याजाची रक्कम कायम राहिल्याने शेतकऱ्यांची सुटका अपूर्णच होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेत 16 जुलै 2024 रोजी तब्बल 145 कोटी 27 लाख रुपयांच्या व्याजमाफीचा निर्णय घेतला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निधीची घोषणा झाल्यानंतर 2025 मध्ये प्रत्यक्ष धनादेश सुपूर्द करण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्जाचा बोजा हटण्याचा मार्ग मोकळा झाला.
कोणत्या 14 गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार?
या कर्जमाफीचा लाभ महालगाव, भगूर, पानवी, टेंभी, सिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी, माळीसागज, कनकसागज, टाकळीसागज, गोळवाडी, पालखेड आणि दहेगाव या गावांतील शेतकऱ्यांना मिळाला आहे. अनेकांच्या आयुष्यात प्रथमच कर्जमुक्तीचा अनुभव आला असून वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
