नोकरीची संधी, पण परंपरांचा अडसर
मूळ कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कविता मिश्रा यांचं लग्न १९९६ मध्ये झालं. त्या मध्यमवर्गीय आणि रूढीवादी कुटुंबातून येतात. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून संगणक शास्त्रात डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षणानंतर त्यांना थेट Infosys कडून सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीची ऑफर मिळाली. मात्र घरातील परंपरा आणि सामाजिक बंधनांमुळे घराबाहेर नोकरी करण्याची परवानगी मिळाली नाही. सासरच्या दबावामुळे अखेर त्यांना ही सुवर्णसंधी नाकारावी लागली.
advertisement
नापीक जमिनीशी संघर्ष
नोकरी गेली तरी कविता थांबल्या नाही. पतीच्या पाठिंब्याने त्यांनी रायचूर जिल्ह्यातील कवितातल येथील वडिलोपार्जित जमीन विकसित करण्याचा निर्णय घेतला. ही जमीन पूर्णपणे खडकाळ, डोंगराळ आणि नापीक होती. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. दीर्घ प्रयत्नांनंतर २००६ मध्ये तिने डाळिंबाची लागवड सुरू केली. काही वर्षे चांगलं उत्पन्न मिळालं, मात्र २०११-१२ मध्ये बॅक्टेरियल ब्लाइट या रोगामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. आठ-दहा वर्षांच्या मेहनतीनंतर पुन्हा एकदा तिच्या हातात नापीक जमीन उरली.
अपयशातून नवा मार्ग
या टप्प्यावर अनेक जणांनी हार मानले असते, पण कविताने तसं केलं नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी एकात्मिक शेतीचा मार्ग स्वीकारला. यातूनच “कविता मिश्रा सँडलवुड फार्म” या संकल्पनेचा जन्म झाला. रायचूर जिल्ह्यातील या फार्ममध्ये पांढऱ्या चंदनाची लागवड मुख्य आहे. त्यासोबतच आंबा, पेरू, सीताफळ, आवळा, नारळ, केळी, शेवगा, लिंबू, सपोटा, कढीपत्ता, हळद, मिरपूड, कॉफी, चमेली अशा विविध पिकांची लागवड केली जाते. साग आणि लाल चंदनामुळे हे फार्म कृषी वनीकरणाचं उत्तम उदाहरण ठरलं आहे.
आज ४० लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न
कविताने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली. पांढऱ्या आणि लाल चंदनाच्या विक्रीसाठी तिने Karnataka Soaps and Detergents Limited सोबत अधिकृत करार केला. चोरीचा धोका लक्षात घेऊन शेतात मायक्रोचिप-आधारित ई-सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल थेट पोलिसांपर्यंत पोहोचते.
आज कविता मिश्रा आपल्या फार्ममधून दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं, तरी मेहनत, चिकाटी आणि नव्या विचारांमुळे तिने शेतीतून स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
