कर्करोगाचं निदान
गौतम राठोड यांनी बी.कॉम शिक्षण पूर्ण केल्यानंतर तळेगावमध्ये स्वतःचे गॅरेज सुरू केले होते. सुरुवातीला त्यांचा व्यवसाय चांगला चालला आणि आर्थिक परिस्थितीही स्थिर होती. मात्र, अचानक त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. त्यांना कर्करोगाचे निदान झाले. उजव्या किडनीमध्ये गाठ आढळल्यामुळे शस्त्रक्रिया करून ती किडनी काढावी लागली. या आजारामुळे त्यांना जड काम करणे शक्य राहिले नाही आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
advertisement
याच काळात एका मित्राने त्यांना केशर लागवडीसंबंधीचा व्हिडिओ पाठवला. या व्हिडिओने त्यांना नव्या दिशेने विचार करण्यास भाग पाडले. त्यांनी केशर लागवडीबाबत सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली. विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होत त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि या पिकाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी हायड्रोपोनिक शेती करण्याचा निर्णय घेतला.
१० बाय १२ फूट खोलीत सुरू केला व्यवसाय
गौतम यांनी आपल्या इमारतीच्या छतावर सुमारे १० बाय १२ फूट जागेत बंद खोली तयार करून व्हर्टिकल फार्मिंगद्वारे केशर लागवडीसाठी आवश्यक वातावरण निर्माण केले. काश्मीरमधून केशरचे बियाणे मागवून त्यांनी लागवड केली. पिकासाठी आवश्यक तापमान, आर्द्रता आणि हवा यांची योग्य काळजी घेतली. या आधुनिक पद्धतीमुळे अवघ्या तीन महिन्यांत केशराचे पीक तयार झाले.
८०० रु प्रति ग्रॅम दर मिळतोय
ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पहिली काढणी केली आणि उच्च प्रतीचे केशर मिळवण्यात यशस्वी ठरले. सध्या बाजारात १२ ते १३ मिमी लांबीच्या केशराला ८० ते ८०० रुपये प्रति ग्रॅम दर मिळत आहे. उत्कृष्ट दर्जाचे केशर सुमारे ४०० रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे. कमी जागेत आणि कमी मेहनतीत अधिक उत्पन्न देणारे हे पीक असल्यामुळे गौतम यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे.
आज गौतम राठोड यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः आरोग्याच्या अडचणींवर मात करून त्यांनी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने उभा केलेला हा व्यवसाय कौतुकास्पद आहे.
