मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली: दसरा आणि दिवाळी सणाच्या तोंडावर झेंडू फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. झेंडुची झाडं व्यवस्थित तयार झाली असून आता फुलं यायला सुरुवात होईल. टुमदार झाडांमुळे ती जमिनीवर झुकली जातात. त्यामुळे जमिनीतील किड्यांचा त्रास या झाडांना होऊ शकतो. शिवाय फुलं जमिनीवर घासली जाऊन खराब होण्याचा धोका असतो.
advertisement
मग अशावेळी झेंडुच्या झाडांची काळजी घेण्यासाठी हिंगोलीच्या शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. यासाठी फार खर्चही येणार नाही. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी झेंडूची शेती करतात आणि सध्या या फुलांना बहर येत आहे. मात्र, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बांबूंचा आधार देण्यास सुरुवात केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे झेंडूच्या मोठ्या झाडांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी ही खबरदारी घेत आहेत. प्रत्येक झाडाला बांबूचा आधार दिल्याने झाडे वाऱ्यामुळे पडणार नाहीत आणि फुलांचे नुकसान टळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीसाठी चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी ही मेहनत घेत आहेत. बांबूंचा आधार लावण्यामुळे वादळी वाऱ्याचा फटका बसला तरी पीक सुरक्षित राहील आणि शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.
झेंडुची फुलं काढून हैदराबाद, अमरावती मार्केटमध्ये विकण्याचा मानस या शेतकऱ्याचा आहे. तिथे याला चांगला भाव मिळेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. झेंडूची झाडं वादळी वाऱ्याने खराब होऊ नयेत आणि जमिनीवर झुकली जाऊ नयेत यासाठी हा देसी जुगाड शेतकऱ्यांने केला आहे.