नैसर्गिक कीटक नियंत्रणाची संकल्पना
नैसर्गिक कीटक नियंत्रण म्हणजे रासायनिक औषधांऐवजी सेंद्रिय, वनस्पतीजन्य आणि जैविक घटकांचा वापर करून पिकांचे संरक्षण करणे. यामध्ये घरगुती द्रावणे, जैविक घटक, उपयुक्त कीटक आणि पारंपरिक उपायांचा समावेश होतो. या पद्धतीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते आणि मातीची गुणवत्ता अबाधित राहते.
कडू निंब
नैसर्गिक कीटकनाशकांमध्ये निंबाला विशेष महत्त्व आहे. नीमाच्या पानांपासून, बियांपासून किंवा तेलापासून तयार केलेले अर्क विविध प्रकारच्या कीटकांवर प्रभावी ठरतात. नीम अर्क कीटकांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो आणि त्यांची संख्या कमी करतो. साधारणतः ५० मिली नीम तेल ५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास भाजीपाला, फळझाडे आणि धान्य पिकांवर चांगले परिणाम दिसून येतात.
advertisement
लसूण-मिरची द्रावण
लसूण आणि हिरव्या मिरच्यांपासून तयार केलेले द्रावणही कीटक नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. लसूण आणि मिरच्या बारीक करून पाण्यात मिसळाव्यात, २४ तास ठेवल्यानंतर गाळून फवारणी करावी. या मिश्रणाचा तीव्र वास पानांवर हल्ला करणाऱ्या कीटकांना दूर ठेवतो. हा उपाय घरच्या घरी तयार करता येत असल्याने खर्चही कमी येतो.
सापळे
सेंद्रिय शेतीत उपयुक्त कीटकांचा वापर महत्त्वाचा मानला जातो. उदाहरणार्थ, लेडीबर्ड बीटल (गुबेराला) मावा आणि इतर हानिकारक कीटक खातात. तसेच शेतात पिवळे किंवा निळे चिकट सापळे लावल्यास उडणाऱ्या कीटकांची संख्या कमी करता येते. या पद्धतींमुळे रसायनांशिवाय कीटकांवर नियंत्रण मिळवता येते.
गोमूत्र आणि जीवामृत
गोमूत्रापासून तयार केलेले द्रावण पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते आणि अनेक कीटकांना दूर ठेवण्यास मदत करते. जीवामृत जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ घडवून आणते, ज्यामुळे झाडे निरोगी राहतात. निरोगी पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो.
पीक फेरपालट आणि मिश्र शेतीचे महत्त्व
एकाच शेतात वारंवार तेच पीक घेतल्यास विशिष्ट कीटकांची संख्या वाढते. त्यामुळे पीक फेरपालट केल्यास कीटकांचे जीवनचक्र खंडित होते. तसेच तुळस, झेंडू, पुदिना यांसारख्या वनस्पतींची मिश्र लागवड केल्यास कीटक दूर राहण्यास मदत होते.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
नैसर्गिक कीटक नियंत्रणामुळे रासायनिक औषधांवरील खर्च कमी होतो. मातीची सुपीकता टिकून राहते आणि सेंद्रिय उत्पादनांना बाजारात अधिक मागणी व चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
