केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून देशभरात या योजनेंतर्गत उत्पादने विक्रीस आणली जात आहेत. याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या. मंत्री रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘भारत’ ब्रँड उत्पादने विक्रीसाठी रवाना करणाऱ्या फिरत्या वाहनांना सुरुवात झाली. तसेच, या कार्यक्रमात प्रतीकात्मक स्वरूपात ग्राहकांना या उत्पादनांचे वितरणही करण्यात आले.
advertisement
मंत्री रावल म्हणाले की, नाफेडचे देशभरात विस्तृत जाळे आहे. त्याद्वारे थेट शेतकऱ्यांकडून उत्पादने खरेदी केली जातात. यामुळे ग्राहकांपर्यंत ही उत्पादने कमी दरात आणि थेट पोहोचणे शक्य होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो आणि ग्राहकांना स्वस्त व दर्जेदार अन्नधान्य मिळते, अशी दोन्ही बाजूंसाठी लाभदायी योजना ठरत आहे.
परवडणारे दर आणि ग्राहकांसाठी सोय
या उपक्रमांतर्गत ग्राहकांना अत्यंत वाजवी दरात धान्य उपलब्ध होत आहे. ‘भारत आटा’ 31.50 रुपये प्रति किलो, तर ‘भारत तांदूळ’ 34 रुपये प्रति किलो या दराने विक्रीस ठेवण्यात आला आहे. हे दर बाजारभावापेक्षा कमी असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, स्वयंपाकघरातील आवश्यक भाजीपाला म्हणून कांदाही या योजनेतून पुरवण्यात येत आहे.
नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी सांगितले की, ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाइल व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांद्वारे ‘भारत’ ब्रँडची उत्पादने थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवली जातील. त्यामुळे ग्राहकांना बाजारात धावपळ करण्याची गरज राहणार नाही.
शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा
‘भारत’ ब्रँडच्या माध्यमातून सुरू केलेल्या या योजनेचा फायदा केवळ ग्राहकांनाच नाही तर शेतकऱ्यांनाही होणार आहे. थेट शेतकऱ्यांकडून उत्पादने खरेदी केल्यामुळे त्यांना योग्य दर मिळतो. मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होत असल्याने शेतकरी आणि ग्राहक या दोघांमध्ये थेट संबंध प्रस्थापित होतो. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त धान्य तर शेतकऱ्यांना हमीभाव अशा दोन्ही बाजूंनी लाभ होतो.
सरकारची वचनबद्धता
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने देशातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व परवडणारे अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने विक्रीस आणली गेली आहेत. या उपक्रमामुळे महागाईच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.