शासनाच्या निर्णयानुसार, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती किंवा नाफेडमार्फत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणी व कागदपत्रांची अपूर्णता यामुळे अनेकांना लाभ मिळू शकला नव्हता. त्यामुळे शेतकरी नाराज होते आणि या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
advertisement
किती शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
या संदर्भात आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून निवेदन दिले. त्यांनी अनुदान मिळाले नाही तर शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल, असे ठळकपणे सांगितले होते. अखेर शासनाने त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोपरगाव तालुक्यातील 210 शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले आहे.
या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, गेल्या काही वर्षांत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले होते. उत्पादन खर्चही भरून न येण्याच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडले होते. अनुदानामुळे त्यांना आर्थिक मदत मिळून सावरण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांची बँक खाती व कागदपत्रे पडताळून पारदर्शक पद्धतीने निधी वितरीत केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कांदा उत्पादन हा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आधार असून, शेतकरी पिकाचा योग्य दर न मिळाल्यास मोठ्या अडचणीत येतात. त्यामुळे अनुदानाची ही रक्कम एक आर्थिक दिलासा ठरणार आहे.