नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, २२वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हप्ता देखील पुढील महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
advertisement
दोन्ही हप्ते एकत्र येणार?
पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे दर चार महिन्यांनी दिले जातात. पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे. याच कालावधीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करण्यात येणार असल्याने, शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ४ हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने, त्याआधीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील दहा दिवसांत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सुमारे ९० ते ९४ लाख लाभार्थी शेतकरी आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण आठ दिवसांच्या आत राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करणार आहे.
