60 हजार शेतकऱ्यांना धक्का
या नव्या नियमामुळे महाराष्ट्रातील तब्बल 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 20 वा हप्ता मिळालेला नाही. पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आला. राज्यातील 92 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी या हप्त्याचा लाभ घेतला असला तरी, नियमांमुळे काहींचे पैसे रोखले गेले.
आता कुटुंबातील एकालाच लाभ
advertisement
सरकारने योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले. या चौघांपैकी फक्त एका व्यक्तीला लाभ घेता येईल. जर पती-पत्नी दोघांच्या नावावर जमीन असेल, तर पतीचा हप्ता बंद करून पत्नीचा सुरू ठेवण्यात आला आहे. मुलगा-मुलगी यांनाही स्वतंत्र हप्ता मिळणार नाही.
शेतकऱ्यांची नाराजी
या निर्णयामुळे प्रभावित शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कारण, अनेक कुटुंबांमध्ये पती-पत्नी वेगवेगळ्या जमिनीची शेती करतात. अशा परिस्थितीत केवळ एका व्यक्तीला लाभ देणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तपासणी व पडताळणी
कृषी विभागाच्या माहितीनुसार, लाखभराहून अधिक कुटुंबांची पडताळणी करण्यात आली. त्यातून 60 हजार शेतकरी असे आढळले ज्यांचा हप्ता रोखण्यात आला आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे हा हप्ता पुढे मिळणार का? तसेच पूर्वीचे हप्ते परत घेतले जातील का? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
हप्ता मिळण्यासाठी आवश्यक अटी
पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी बंधनकारक आहेत. जसे की,
शेतकऱ्याच्या नावावरची जमीन 2019 पूर्वी खरेदी केलेली असणे आवश्यक.
भूमिअभिलेख नोंदणी अद्ययावत करणे.
बँक खाते आधारशी संलग्न असणे.
ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे.
शेतकऱ्यांचा संताप वाढला
मानधन रोखल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. पूर्वी दिलेले हप्ते योग्य होते, मग अचानक नियम कडक करून फक्त पत्नीला मानधन का दिले जात आहे? असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. यावर केंद्र सरकारकडून तातडीने निर्णय व स्पष्टीकरण अपेक्षित आहे.