उद्यानविद्या विभागातील अंतिम वर्षाच्या 70 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती अनुभव देण्यासाठी कृषी अनुभवातून शिक्षण उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी दोन गटांमध्ये विभागून स्ट्रॉबेरी कांद्याचे बियाणे उत्पादन करतात. रोप तयार करण्यापासून लागवड, व्यवस्थापन आणि बियाणे तयार होईपर्यंत सर्व प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करतात.
Red Chilli : लाल मिरचीने आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, भाव आले अर्ध्यावर, कारण काय? Video
advertisement
या उपक्रमात तयार करण्यात आलेले फुले समर्थ हे कांद्याचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित झालेले असून, याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे वाण 85 ते 90 दिवसांत तयार होते. उभट-गोल आणि लालसर रंगाचा असल्यामुळे बाजारात त्याला मागणीही चांगली असते. खरीप हंगामासाठी हे वाण विशेषतः उपयुक्त ठरते.
विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या 162 किलो बियाण्याची किंमत प्रति किलो 2500 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. केवळ तीन तासांत संपूर्ण साठा विकला गेला. मिळालेल्या उत्पन्नातून सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये समान प्रमाणात वाटला जातो. 50 टक्के विद्यार्थ्यांना आणि 50 टक्के महाविद्यालयाला.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना शेतीतून उत्पन्नाचे स्रोत समजावून देणे आणि त्यांना शेतीचा व्यावसायिक दृष्टीकोन देणे. शेतकऱ्यांनाही दर्जेदार बियाणे मिळावे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा, या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांनी ही माहिती दिली असून, भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.





