जीएसटी कपातीचे परिणाम
पान मसाला, गुटखा, सिगारेट, जर्दा, न प्रक्रिया केलेला तंबाखू आणि बीडी यांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. हे नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा कृषी यंत्रसामग्री उत्पादक आणि शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, उत्पादक कंपन्या अजूनही त्यांच्या कच्चा माल पुरवठादारांकडून सुधारित किंमत यादीची वाट पाहत आहेत.
advertisement
अवजारे तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किंमतीत किती कपात होणार आहे, यावर संपूर्ण गणित अवलंबून आहे. पुरवठादारांकडून मिळणाऱ्या कोटेशननुसारच यंत्रांच्या मूळ किमती ठरवल्या जातील.
उद्योगातील संभ्रम
अॅग्रिकल्चरल मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारत पाटील यांनी सांगितले की, ‘‘कृषी यंत्रांवरील जीएसटी आता पाच टक्क्यांवर आला असून एकूण सात टक्क्यांची सवलत ग्राहकांना मिळू शकते. मात्र सुट्या भागांवर जीएसटी कपात होईल की नाही, हा संभ्रम कायम आहे. जर पुरवठादारांनी आम्हाला पूर्ण सवलत दिली, तरच ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. अन्यथा आम्हाला उत्पादन खर्च पुन्हा मोजावा लागेल. यासाठी किमान दोन आठवडे लागतील.’’
शेतकऱ्यांना किती फायदा?
‘खेतीगाडी’चे संस्थापक आणि ट्रॅक्टर उद्योगाचे अभ्यासक प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली की, ‘‘केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, पण किमती लगेच कमी होतील असं नाही. कारण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कंपन्यांना गणित मांडावं लागणार आहे.
आमच्या अंदाजानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीत २६ हजार ते ६५ हजार रुपयांपर्यंत बचत होईल. ट्रॅक्टरचलित अवजारांवर ५ हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत, तर उच्च क्षमतेच्या आधुनिक यंत्रांवर तब्बल ५० हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. मात्र, यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.’’
दिवाळीची बाजारपेठ रंगणार
तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या सणासुदीत जीएसटी कपातीचा परिणाम प्रत्यक्षात जाणवेल. कारण त्यावेळी कंपन्यांनी सुधारित किमती लागू केल्या असतील आणि शेतकरी खरेदीसाठी मोठ्या संख्येने पुढे येतील. त्यामुळे कृषी यंत्रसामग्रीची बाजारपेठ दिवाळीत प्रचंड गजबजलेली असेल, यात शंका नाही.