सिंधुदुर्ग - आज अनेकजण सरकारी नोकरीच्या मागे अनेक वर्ष तयारी करतात. अनेकांना यश मिळते. तर बहुतांश जणांच्या पदरी अपयश मिळते. मात्र, काही जण असे असतात, जे नोकरी करत असतानाही शेती करुन चांगले उत्पन्न घेतात. आज अशाच एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
विशाल गुरव असे या व्यक्तीचे नाव आहे. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील विशाल गुरव यांनी सरकारी नोकरी सांभाळून गांडूळ शेती प्रकल्प यशस्वी केला आहे. आज ते या व्यवसायातून सरकारी नोकरी इतके उत्पन्न कमावत आहेत.
advertisement
विशाल यांना आधीपासूनच शेतीची आवड होती. दरम्यान, बारावीनंतर त्यांना लगेच सरकारी नोकरी लागली. मात्र, नोकरीपेक्षा शेतीत त्याचे मन जास्त रमत असल्याने त्यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2022 साली त्यांनी या प्रकल्पास सुरुवात केली. सुरुवातीस अडचणीना सामना करावा लागला. मात्र, आज त्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला आहे.
आपली नोकरी सांभाळून ते व्यवसायात लक्ष देत आहेत. या गांडूळ खतास म्हणावे तितके मार्केट सिंधुदुर्गात नसल्याने बाहेरील जिल्ह्यात ते खताची विक्री करत आहेत. दरवर्षी ते गांडूळ खताच्या 2 ते 3 बॅच घेतात. एका बॅचला 25 ते 30 टनाचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाबद्दल सांगताना ते म्हणाले की, सिंधुदुर्गातील तरुणांनी अशा व्यवसायांकडे रोजगाराच्या दृष्टीने पहावे. नोकरीच्या मागे न धावता कोकणातील शेतीपूरक व्यवसायांकडे लक्ष द्यावे. आज ते या व्यवसायातून सरकारी नोकरीपेक्षा जास्त म्हणजे महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू, आंबा पीक जास्त आहे. पण त्या तुलनेत सेंद्रिय शेतीकडे लोकांचे प्रमाण फार कमी आहे. रासायनिक खत विकत घेण्यापेक्षा स्वतः घरच्या घरी आपल्या आवश्यकतेनुसार तरी खताची निर्मिती केल्यास शेतीचीही सुधारणा होऊ शकते. तसेच स्थानिक युवकांना अशा व्यवसायांमध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.