शेतजमिनीच्या वाटणीचा कायदेशीर अधिकार
शेतजमीन ही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित असू शकते. वडिलोपार्जित शेतजमिनीत सर्व सहहिस्सेदारांना (भाऊ, बहिणी इ.) कायदेशीर हक्क असतो. मात्र शेजारचा शेतकरी हा सहहिस्सेदार नसल्यास त्याला तुमच्या जमिनीच्या वाटणीला थेट विरोध करण्याचा कोणताही अधिकार नाही. केवळ शेजारी असल्यामुळे तो वाटणी थांबवू शकत नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
पहिला टप्पा, अधिकृत मोजणीची मागणी
जर शेजारी वाटणी किंवा सीमांकनास अडथळा आणत असेल, तर सर्वप्रथम तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करावा. ही मोजणी महाराष्ट्र महसूल विभाग अंतर्गत अधिकृतपणे केली जाते. मोजणीदरम्यान शेजाऱ्याला नोटीस दिली जाते. तरीही तो गैरहजर राहिला किंवा विरोध केला, तरी महसूल अधिकारी कायदेशीर मोजणी पूर्ण करू शकतात.
वाटणी नोंद कशी करावी?
सहहिस्सेदारांमध्ये वाटणी झाल्यानंतर फाळणी नोंद (Partition Entry) सातबारा उताऱ्यावर करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर शेजारी चुकीच्या पद्धतीने वाटणी अडवत असेल, तर उपविभागीय अधिकारी (SDO) किंवा तहसीलदारांकडे दाद मागता येते. महसूल कायद्यानुसार प्रशासनाला वाटणी नोंद करण्याचा अधिकार आहे.
शेजारी जबरदस्ती करत असेल तर काय करावे?
जर शेजारचा शेतकरी वाटणी झालेल्या जमिनीवर जबरदस्तीने नांगरणी करत असेल, पीक काढत असेल किंवा धमकावत असेल, तर हा गुन्हा ठरू शकतो. अशा वेळी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता येते. जमिनीवर अतिक्रमण, धमकी किंवा दंगलजन्य परिस्थिती निर्माण केल्यास भारतीय दंड संहितेतील (IPC) संबंधित कलमे लागू होऊ शकतात.
दिवाणी न्यायालयाचा मार्ग
प्रशासनाकडून दिलासा न मिळाल्यास शेवटचा आणि प्रभावी मार्ग म्हणजे दिवाणी न्यायालय. शेतकरी दिवाणी न्यायालय मध्ये ‘जमिनीच्या वाटणीचा दावा’ (Partition Suit) दाखल करू शकतो. यासोबतच तात्पुरत्या स्थगितीचा (Stay / Injunction) अर्ज केल्यास, न्यायालय शेजाऱ्याला जमिनीत हस्तक्षेप करण्यास मनाई करू शकते.
महत्त्वाचे कागदपत्रे कोणती?
वाटणीचा दावा करताना सातबारा उतारा, फेरफार नोंदी, मोजणी नकाशा, जुनी वाटणी कागदपत्रे (असतील तर), तसेच साक्षीदारांची नावे ही कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. कागदपत्रे मजबूत असतील, तर न्यायालयीन लढा सोपा होतो.
तज्ज्ञांचा सल्ला का आवश्यक?
प्रत्येक जमिनीचा इतिहास वेगळा असतो. त्यामुळे महसूल वकील किंवा भूमी विषयक तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. चुकीची पायरी उचलल्यास प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते.
