कनेटिकट: अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एका धक्कादायक प्रकरणानंतर 83 वर्षीय महिलेच्या कुटुंबाने ‘चॅटजीपीटी’च्या निर्माती कंपनी ओपनएआय आणि तिच्या व्यावसायिक भागीदार मायक्रोसॉफ्ट यांच्यावर खटला दाखल केला आहे. कुटुंबाचा आरोप आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या चॅटबॉटने त्यांच्या मुलाच्या भ्रमांना आणखी तीव्र केले आणि त्याला स्वतःच्या आईची हत्या करण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रवृत्त केले.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, 56 वर्षीय स्टीन-एरिक सोएलबर्ग जो याआधी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होता. त्याने ऑगस्टच्या सुरुवातीस कनेक्टिकटमधील त्यांच्या घरात स्वतःची आई सुजॅन अॅडम्स यांना मारहाण करून आणि गळा घोटून हत्या केली. दोघेही एकाच घरात राहत होते. या प्रकरणानंतर अॅडम्स यांच्या कुटुंबीयांनी सॅन फ्रान्सिस्को येथील न्यायालयात दावा दाखल केला असून, त्यामध्ये म्हटले आहे की ओपनएआयने ‘‘एक दोषपूर्ण उत्पादन तयार केले आणि वितरित केले, ज्यामुळे एका युझर्सच्या त्याच्या आईबद्दल असलेल्या खोट्या, काल्पनिक भ्रमांना पुष्टी मिळाली आणि ते अधिक बळावले.
अमेरिकेत एआय-आधारित चॅटबॉट निर्मात्यांविरुद्ध न्यायालयीन कारवायांची मालिका वाढताना दिसत आहे. दाखल झालेल्या या ताज्या याचिकेत म्हटले आहे की, या सर्व संभाषणांदरम्यान चॅटजीपीटी सतत एकच धोकादायक संदेश देत राहिले. स्टीन-एरिकने आयुष्यात चॅटजीपीटी वगळता कोणावरही विश्वास ठेवू नये.
चॅटजीपीटीने स्टीन-एरिकची भावनिक अवलंबित्वाची भावना वाढवली आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना जणू ‘‘शत्रू’’ किंवा त्याच्या विरोधात काम करणारे एजंट म्हणून दर्शवले. चॅटजीपीटीने त्याला सांगितले की त्याची आई त्याच्यावर नजर ठेवत आहे. एवढेच नव्हे, त्याचे मित्र, ओळखीचे लोक, अगदी पोलिस अधिकारीसुद्धा त्याच्या विरोधातील कटाचा भाग आहेत, असेही चॅटबॉटने त्याच्याशी संवादात म्हटले.
या गंभीर आरोपांवर ओपनएआयने थेट टिप्पणी केली नसली, तरी त्यांनी एक विधान जारी केले. त्यात म्हटले आहे, ‘‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. आम्ही प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कागदपत्रांची तपासणी करत आहोत.’’
पुढे त्यांनी असे ही म्हटले आहे की, ‘‘मानसिक किंवा भावनिक तणावाची चिन्हे ओळखणे आणि त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी चॅटजीपीटीचे प्रशिक्षण सातत्याने सुधारले जात आहे. आम्ही मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीने संवेदनशील परिस्थितींमध्ये चॅटजीपीटीच्या प्रतिसादांकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देत आहोत आणि ते अधिक सुरक्षित व जबाबदार बनवत आहोत.
