कोल्हापूर : आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रतिकूल आणि अनुकूल घटनांना ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या ग्रह, राशी आणि नक्षत्रं कारणीभूत असतात, असं म्हटलं जातं. येणाऱ्या नववर्षात बाराही राशींसाठी हा कालखंड कसा जाणार हे जाणून घेण्यासाठी लोकल 18 ने सुरू केलेल्या मालिकेत आपण सिंह राशीबद्दल जाणून घेणार आहोत. एकूणच 2025 वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंध सिंह राशीसाठी कसे असतील? आपण याबद्दल सविस्तर कोल्हापुरातील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
काय आहेत सिंह राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये?
राशीचक्रामधील सिंह ही पाचवी रास कुंडलीमध्ये पाच या अंकांनी दर्शवली जाते. आकाशामध्ये ही राशी सिंहाच्या आकृतीत दिसत असल्याकारणाने या राशीचे चिन्ह देखील सिंह हे दिलेले आहे. सिंह हा जंगलाचा राजा असल्याने राजाचे गुणधर्म या राशीत असल्याचे दिसून येतात. या राशीचा स्वामी देखील नवग्रहांमधील राजा रवी हा असून राजाच्या अंगी जे गुणधर्म असले पाहिजेत असे गुणधर्म या राशीच्या लोकांमध्ये असलेले दिसून येतात. या लोकांना अन्यायाची चीड असते, नेहमी न्याय करण्यासाठी पुढाकार घेतात. खोटे बोललेले आवडत नाही. नियमाविरुद्ध वागलेले आवडत नाही. तसेच नेहमी नियम आणि कायदा यांचे पालन ह्या राशी करत असतात.
Numerology 2025: तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे? नव्या वर्षात हवे ते मिळणार, पण...
या राशीचे लोक कुणाच्या दबावाखाली काम करायला बघत नाहीत. यांना कायम दुसऱ्यावरती हुकूमत गाजवण्याची इच्छा असते. त्यानुसार हाताखालील लोकांना वागवत असतात. हाताखालील लोकांनी नियम भंग केलेला यांना अजिबात आवडत नाही. ही रास स्थिर स्वभावाची असून अग्नी तत्वाची आहे. या व्यक्तींना आपल्या जीवनातील बदल चटकन स्वीकारता येत नाहीत. तसेच अग्नी तत्वाची रास असल्याकारणाने चटकन राग येतो आणि स्वभावामध्ये तापटपणा असतो. गोरगरिबांवरती दया करणे तसेच दुर्बलांवरती उपकार करणे हे यांना आवडते. आपलेच मत दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याने बऱ्याच वेळा यांची ओळख हेकेखोर म्हणून होते. उष्णतेचे विकार यांना वारंवार सतावत असतात. पित्ताचा त्रास, निद्रानाश तसेच मुळव्याधासारखे विकार त्रासदायक ठरतात. यांचे जर व्यक्तिमत्व बघायला गेले तर यांचे कपाळ मोठे असून डोक्यावरती केस विरळ असतात. व्यक्तिमत्व आकर्षक असे असते. राजबिंड या व्यक्तिमत्वामुळे समोरच्या व्यक्तीवरती छाप पाडतात, असं ज्योतिषी सांगतात.
ग्रहमान बदलाचा काय परिणाम होणार?
या राशीचा शत्रू ग्रह जो आहे तो शनी आहे आणि येणाऱ्या वर्षात दिनांक 29 मार्च रोजी शनी ग्रह कुंभ राशीमधून मीन राशिमध्ये प्रवेश करत असून सिंह राशीला छोटी साडेसाती म्हणजेच पनोती ज्याला आपण ढैय्या असे देखील म्हणतो ती सुरू होत आहे. ही पनोती अडीच वर्षे राहते. या पनोतीच्या काळामध्ये करत असलेल्या गोष्टी अंगलट येत असलेल्या जाणवतील. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना फार काळजीपूर्वक करणे फार आवश्यक आहे. यामुळे कुणालाही फुकटचा सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये.
या काळामध्ये संयम बाळगणे फार महत्त्वाचे आहे, कोणताही निर्णय फार घाईगडबडीत घेऊ नये. घेतलेले निर्णय अडकून राहतील. त्यामुळे निर्णय घेतानाच विचार करून निर्णय घ्यावा. कार्यालयात किंवा नोकरीमध्ये वरिष्ठ लोकांशी बोलताना फार संयमाने बोलावे, आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून, आपल्या वरतीच बोल लागण्याची शक्यता राहते. या काळामध्ये आपण आपले चारित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा, आपल्या चारित्र्यावरती कोणत्याही प्रकारे डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक ठिकाणी ताठरपणा ठेवू नये. काही ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असं ज्योतिषी सांगतात.
शनीच्या गोचर बदलानंतर ज्या ग्रहाचे गोचर भ्रमण होणार आहे तो ग्रह म्हणजे गुरु असून 14 मे रोजी गुरु वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करीत आहे. त्यामुळे 14 मे पर्यंत दहावा असणारा गुरु त्यानंतर अकरावा होत आहे. त्या कारणाने शनीच्या ढैय्या पनोतीचा जो काही त्रास आहे, तो या अकराव्या गुरुमुळे शुभ फलदायक ठरेल. या काळामध्ये मित्रवर्ग आपणास मदत करणारा भेटेल. ढैय्या पनोतीमुळे येणाऱ्या अडचणीतून मित्रवर्ग आपणास बाहेर काढणारा ठरेल. ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ हा अचानक खर्च वाढवणारा ठरेल त्यामुळे आपण आपल्या आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडा चिंता करणारा असल्याने औषधोपचारांवरती खर्च वाढेल. ऑक्टोबरपर्यंत असणारा गुरु हा विद्यार्थी वर्गाला फायदेशीर असा ठरणार असून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने यश मिळवून देणारा हा कालखंड राहील.
कायदे, नियम तोडू नका, अन्यथा धोका! 8, 17 किंवा 26 जन्मतारीख असणाऱ्यांना कसं असेल नवं वर्ष?
प्रेम प्रकरणांच्या दृष्टीतून हा कालखंड अतिशय महत्त्वाचा ठरणार असून प्रेमाची कबुली या काळामध्ये दिली जाईल. आपल्या जीवनातील जोडीदाराकडून आपणास चांगली मदत प्राप्त होईल तसेच आपल्या अडचणींमध्ये तो आपल्या सोबत उभा राहील. नवीन तीर्थक्षेत्रांना आपल्या भेटी दिल्या जातील. या काळात देवधर्मासाठी आपला प्रवास घडेल.
29 मे ला राहू आणि केतू गोचरने आपले राशी आणि स्थान बदल करीत असून यामुळे संसाराबद्दल काही काळ विरक्ती निर्माण होईल संसारातून मन उडेल. मात्र हे फार काळ नाही. काही काळासाठीच राहील आणि पुन्हा आपले मन संसारात रमेल. व्यावसायिक भागीदारांकडून आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. अशावेळी आपण कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता किंवा कोणत्याही निष्कर्षाला चटकन न येता संयमाने परिस्थिती हाताळावी. संधिवात आणि रक्तदाबासारखे विकार उद्भवतील आणि त्यासाठी खर्च करावा लागेल. आपल्या मेंदूला त्यामुळे अनाठायी तणाव देऊ नये, तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, असं ज्योतिषी सांगतात.
कोणती उपासना कराल?
येणाऱ्या ढैय्या पनोतीच्या होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी दररोज सूर्याची उपासना करावी. शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावे. सकाळी सूर्यनमस्कार घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. आदित्य हृदय स्तोत्र रोज सकाळी वाचावे. आपले कुलाचार आणि कुलधर्म नित्यनेमाने करावे. दररोज आपल्या कुलदेवतेचे स्मरण न चुकता करावे. धार्मिक वादविवादांपासून या काळात आपण लांब राहणे आपल्याला फायदेशीर ठरेल. रोज सायंकाळी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. मंगळवार आणि शनिवार मारुतीचे दर्शन घ्यावे. मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे. गडद रंगाचे कपडे धारण करणे टाळावे. पाळीव प्राण्यांपासून लांब रहावे. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये. त्रास देण्याने आपल्या कुंडलीतील राहूचे फल अधिकच बिघडेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान राखा तसेच आपल्या हाताखालील जे काही सेवक वर्ग असेल, त्यांचा सुद्धा अपमान करणे टाळावे, कारण शनी हा सेवकाचा कारक आहे. सेवकाला दिलेला त्रास हा शनीला दिलेल्या त्रासासारखा आहे, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.