अनिल रामचंद ओचल असं ५२ वर्षीय तक्रारदार व्यावसायिकाचं नाव आहे. ते कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगर परिसरात राहतात. ओचल हे धान्याचे व्यापारी असून त्यांचा इतवारी आणि कळमना इथं व्यवसाय आहे. शनिवारी रात्री त्यांच्या एका नातेवाईकाकडे वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने उमरेड मार्गावरील एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती.
त्यानुसार, तक्रारदार ओचल शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबासह वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. पण ते घराबाहेर गेल्यानंतर एका अज्ञात भामट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे स्लाइडिंग डोअर सरकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर तो दुसऱ्या माळ्यावरील ओचल यांच्या बेडरूममध्ये गेला. बेडरूमच्या कपाटाचे कुलूप तोडून सोने आणि प्लॅटिनमचे हिरे जडीत दागिने चोरी केले आणि पसार झाला.
advertisement
रात्री 1 वाजताच्या सुमारास ओचल कुटुंब घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती कळमना पोलिसांना दिली. माहिती मिळताच कळमना पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासली असता रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक चोर घरात शिरताना दिसला. आरोपीने आधीच ओचल यांच्या घराची रेकी केली असावी, असा अंदाज आहे. त्याला घर आणि बेडरूमबाबत आधीच माहिती होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. फुटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवण्याचा काम पोलीस करत आहेत.
