नवी मुंबई : उधार घेतलेले पैसे परत न केल्याने हत्या केल्याची घटना पनवेल पोलिस ठाण्याचा हद्दीत घडली आहे. या प्रकरणी परिसरातील २३ वर्षीय डेअरी व्यावसायिक मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी यास अटक केली आहे . 25 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा कुंडेवहाळ एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता 55 वर्षीय संगिता नामदेव म्हात्रे या महिला मृत अवस्थेत आढळून आल्या. तपासादरम्यान महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचं आढळलं.
advertisement
तपासादरम्यान मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी याच्याकडे चौकशी केली असता, त्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली. आरोपीने मृत महिलेला 40 हजार रुपये उसने दिले होते. ही रक्कम परत मागितल्यावर महिलेने नकार दिल्यामुळे, संतापाच्या भरात आरोपीने तिचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
चौकशीदरम्यान पोलिसांनी अन्सारीला गाठले असता, त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक चौकशीतून असे स्पष्ट झाले की, मृत महिला आणि आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते. अन्सारीने महिलेला सुमारे ४० हजार रुपये उसने दिले होते, मात्र अनेक वेळा मागणी करूनही महिला पैसे परत करत नव्हत्या.यामुळे रागाच्या भरात अन्सारी तिच्या घरी गेला आणि वाद झाल्यानंतर गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर घटनेला चोरीचा रंग देण्यासाठी तिच्या अंगावरील दागिने काढून नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस पथकाचे कौतुक
या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने अत्यंत दक्षतेने आणि कार्यक्षमतेने केला. सीसीटीव्ही, प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला पकडण्यात पथकाला यश आले. या पथकाच्या चौकस तपासाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे.पुढील तपास पनवेल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
