होळीच्या दिवशी दोन जणांनी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यात घडली आहे. डोक्यात गोळी झाडली गेल्यानं हरिओम शुक्ला याचा जागीच मृत्यू झाला. गोळी झाडणारे दीपक आणि आकाश सध्या बेपत्ता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या निमित्तानं दीपक आणि आकाश यांनी हरिओम याला रंग खेळण्यासाठी आरटीओ ऑफिसजवळ बोलावून घेतलं. जेव्हा हरिओम घटनास्थळी दाखल झाला तेव्हा त्याची वाट पाहत बसलेले दीपक आणि आकाश यांनी होळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं हरिओम याला मिठी मारली आणि काही कळायच्या आतच त्याच्या कानपटात गोळी झाडली. गोळी लागताक्षणी हरिओमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
advertisement
मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना सांगितलं, की भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक परिहार आणि आकाश यादव यांचा एका जमिनीच्या वादावरून हरिओम शुक्ला याच्यावर राग होता. या मुद्द्यावरून यापूर्वीसुद्धा हरिओम याच्या घराच्या बाहेर बंदुकीतून हवेत गोळी झाडण्यात आली होती. त्यानंतर तडजोड करण्याच्या निमित्तानं दोन्ही गटांमध्ये संवाददेखील झाला होता.
होळीच्या पार्टीदरम्यान हत्या
आणखी एका घटनेत झारखंडच्या पलामू जिल्ह्यात होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान एका व्यक्तीनं त्याच्या चुलत भावाची गोळी झाडून हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी कल्याणपूर गावात घडली आहे. मेदिनीनगरचे एसडीपीओ मणिभूषण प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान अजय चौधरी आणि मनोज चौधरी नावाच्या दोन चुलत भावांमध्ये भांडण झालं होतं. अजय याने मनोजवर आधी कात्रीनं हल्ला केला आणि मग पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली. मनोजला तातडीनं मेदिनीराय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर अजय बेपत्ता आहे. पोलीस म्हणाले की, मनोज याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि रस्त्याच्या कडेला दबा धरून दरोडे घालणं आणि यासह आणखी आठ प्रकरणांमध्ये तो पोलिसांना हवा होता.