कौटुंबिक वादातून वैतागलेल्या एका व्यक्तीने पत्नीने सासरी परत येण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून संतापजनक पाऊल उचलले. राहाता तालुक्यातील कोन्हाळे शिवारात शुक्रवारी रात्री एका पतीने स्वतःच्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि नंतर स्वतःही उडी घेत आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये अरुण सुनील काळे (वय 30) याच्यासह त्याची मुले – मुलगी शिवानी (8), मुलगे प्रेम (7), वीर (6) व कबीर (5) यांचा समावेश आहे. पाचही मृतदेह शनिवारी सकाळी विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
advertisement
पत्नी माहेरी, पतीचा संताप...
मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील अरुण काळे यांची पत्नी शिल्पा काही दिवसांपासून माहेरी (ता. येवला) गेली होती. सततच्या वादांमुळे तिने सासरी परतण्यास नकार दिला होता. दरम्यान, चारही मुले अहिल्यानगर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षण घेत होती.
शुक्रवारी अरुण काळे मुलांना केस कापण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून मोटारसायकलवर घेऊन निघाला. त्यानंतर पत्नीला फोन करून परत येण्याची विनंती केली. मात्र, पत्नीने फोन उचलला नाही आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. याचा राग अनावर झाल्याने अरुणने राहाता तालुक्यातील कोन्हाळे-केलवड शिवारातील विहिरीत प्रथम चारही मुलांना ढकलले आणि स्वतःही उडी घेतली.
तर चिमुकली मुले बचावली असती...
यावेळी अरुणने पत्नी शिल्पाला फोन करून, “नांदायला ये, नाहीतर आत्महत्या करीन” अशी धमकी दिली होती. पतीच्या या इशाऱ्याने सावध झालेल्या शिल्पाने तत्काळ शाळेत फोन करून, “मुलांना पतीच्या ताब्यात देऊ नका” असे सांगितले. परंतु, तोपर्यंत अरुण शाळेतून मुले घेऊन निघालाच होता. या दुर्दैवी घटनेनंतर काळे कुटुंब व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.