या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षांचा इरफान नफीस कासार (रिहान गार्डन, लिसाडी गेट) हा गॅस शेगडी दुरुस्त करण्याचं काम करायचा. इरफानचा भाऊ फुरकान याने दिलेल्या माहितीनुसार, इरफानचे किडवईनगरातल्या गल्ली क्रमांक तीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही महिला घटस्फोटित आहे आणि ती आपला मुलगा व मुलीसोबत राहते.
बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास इरफान त्याच्या प्रेयसीच्या घरी गेला होता. गुरुवारी सकाळी सहा वाजता प्रेयसीने इरफानचा भाऊ फुरकान याला त्याच्या मृत्यूची माहिती दिली. हृदयविकाराच्या झटक्याने इरफानचा मृत्यू झाल्याचं तिने सांगितलं. यानंतर संतप्त कुटुंबीय महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा खोलीत इरफानचा मृतदेह पडलेला होता. महिलेने इरफानचा खून केल्याचा आरोप करून कुटुंबीयांनी घटनास्थळी गोंधळ घातला.
advertisement
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कुटुंबीयांना शांत केलं. प्राथमिक पाहणीत इरफानच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा हल्ल्याचे चिन्ह आढळले नाहीत. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीओ कोतवाली आशुतोष कुमार यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. त्यामुळे व्हिसेरा सुरक्षित करण्यात आला आहे. पोलिसांनी इरफानच्या कथित प्रेयसीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. नंतर तिची सुटका करण्यात आली. इरफानच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्याविरोधात पोलीस तक्रार दिलेली नाही.
शवविच्छेदनानंतर इरफानचा मृतदेह घरी आला तेव्हा बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. इरफानचे कुटुंबीय गोंधळ घालू शकतात, अशी माहिती कोणी तरी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीसही तिथे गेले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास इरफानच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
