दिल्लीत दुहेरी हत्याकांडाच्या य़ा घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केलं असून तपास सुरू आहे. आकाश हे त्यांचा मुलगा आणि पुतण्यासोबत दिवाळी साजरी करत होते. मुलं फटाके उडवत असताना स्कुटीवरून दोघे आले. त्यापैकी एक जण खाली उतरून उभा राहिला आणि दुसरा व्यक्ती स्कुटीवरच होता.
आकाश मुलांसोबत फटाके उडवत होते तेव्हा हल्लेखोरांपैकी एकाने आकाश यांच्या पाया पडत काका रामराम असं म्हटलं. त्यानंतर हाच आहे गोळी मार असं म्हणताच दुसऱ्याने गोळीबार केला. तेव्हा घरात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आकाश यांना घरात घुसून मारलं गेलं.
advertisement
हल्लेखोरांनी घराच्या दारातच ऐन दिवाळीच्या तोंडावर केलेल्या या हल्ल्याने सगळेच हादरले आहेत. आकाश यांच्या मुलालासुद्धा गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. आकाश यांच्यावर हल्ल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऋषभवर त्यांनी गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या घटनेत आकाश आणि त्याच्या पुतण्याचा मृत्यू झाला.
घटनेचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे. चार सीसीटीव्ही फूटेजमधून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. आकाश यांचं वय ४० वर्षे तर ऋषभचं वय १६ वर्षे इतकं आहे. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून तो अल्पवयीन असल्याची माहिती समजते. हल्लेखोर हा आकाश यांच्या कुटुंबियांच्या ओळखीचाच असल्याचं सांगण्यात येत आहे.