लॉरेन्स मारीदास हेनरी, त्याची पत्नी शिल्पा हेनरी, विजय पाटणकर आणि नितीन साठे अशी आरोपींची नावे आहेत. तर सुरेश धमगाये असं तक्रारदाराचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मानेवाडा रिंग रोड परिसरात आरोपी लॉरेन्स हेनरी आपल्या पत्नीसह राहतो. तो नेक्सस एचआर सोल्युशन्स ही जॉब प्लेसमेंट बोगस एजन्सी चालवतो. या एजन्सीद्वारे त्याने मंत्री कोट्यातून नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून धमगाये यांची फसवणूक केली.
advertisement
आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींनी पीडित व्यक्तींना मुंबईतील मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेऊन तेथे एका तथाकथित अधिकाऱ्यांची भेट घालून देत मुलाखतीचे नाटक देखील केले. तसेच सरकारी नोकरीचं बोगस नियुक्तीपत्रही दिलं. आरोपींनी 2020 ते 2022 या कालावधीत सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केली होती. पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केला आहे.
सुरुवातीला आरोपींनी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तक्रारदार सुरेश धमगाये यांच्याकडून 12 लाखांची मागणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवत धमगाये यांनी 6 लाख 89 हजार रुपये आरोपींना दिले. यानंतर आरोपींनी धमगाये यांना मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर नेत तेथील रेकॉर्ड रूममध्ये साठे नावाच्या तथाकथित अधिकाऱ्यांशी भेट घडवून दिली. साठेने तिथे मुलाखत घेण्याचं नाटक केलं. मात्र बराच कालावधी उलटून गेला. तरीही आरोपींनी कुठलीही नोकरी लावून दिली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे धमगाये यांच्या लक्षात आले. धमगाये यांनी पैसे परत मागितल्यावर केवळ दोन लाख परत केले. उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर धमगाये यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
