नागपुरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराला हाताशी धरून मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याचं चिठ्ठीत लिहून तरुणाने आयुष्य संपवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुर्गेश्वरी नरेंद्र ठाकरे (41) आणि राहुल मनोहर (45) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दुर्गेश्वरी ही नागपुरच्या गोधनी रेल्वे परिसरातील खान सोसायटीत वास्तव्याला होती. तिने आपला प्रियकर राहुलला हाताशी धरुन पतीला इतका त्रास दिला. की पतीने थेट टोकाचं पाऊल उचललं आहे. दुर्गेश्वरीचे पती नरेंद्र यांनी 17 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात छताच्या हुकला ओढणी बांधून गळफास घेतला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली.
advertisement
पोलिसांनी मयत नरेंद्र यांच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना नरेंद्रने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यात नरेंद्रने दुर्गेश्वरी आणि राहुलमध्ये अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला होता. तसेच दोघेही मिळून त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याचा उल्लेख केला होता. या चिठ्ठीच्या आधारे मानकापूर पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
