या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातल्या आरोपी पतीचं नाव लक्ष्मण उर्फ लिच्छू असं आहे. त्याने आपली पत्नी गीता (वय 64 वर्षं) हिचा खून केला. गीताला मानसिक आजार होता आणि तिच्यावर गेल्या 22 वर्षांपासून उपचार सुरू होते. रविवारी (28 जुलै) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मणने झोपलेल्या गीताच्या डोक्यात काठीने दोनदा वार केले. तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबने घटनास्थळाची पाहणी करून काठी आणि रक्ताने माखलेली चादर जप्त केली आहे. गीताच्या भावाच्या जबाबावरून तहसील कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पती, त्याची दोन मुलं व दोन सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
advertisement
सिंघाना गावातला रहिवासी असलेल्या दिनेश कुमारने सांगितलं, की त्याची बहीण गीता दीनानाथ कॉलनीत राहत होती. तिचा पती लक्ष्मण उर्फ लिच्छू, मुलगा मोनू उर्फ मनोज, जोनी उर्फ प्रदीप, प्रदीपची पत्नी खुशबू, मनोजची पत्नी प्रवेश हेदेखील तिच्यासोबत राहत होते. हे सर्व जण गीताला रोज मारहाण करायचे. सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गीताने तिची बहीण गुड्डीला फोन केला होता. पती लक्ष्मण, मुलगा आणि सून तिला मारहाण करत असल्याचं तिने सांगितलं होतं.
पोलिस चौकशीत आरोपी लक्ष्मणने सांगितलं, की तो 22 वर्षांपासून पत्नीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून औषधे आणत होता. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तो त्रस्त झाला होता. गीतादेखील स्वतःच्या आजाराने त्रस्त होती. वैतागून त्याने तिच्यावर काठीने वार केले.
तहसील कॅम्प पोलीस स्टेशनचे अतिरिक्त प्रभारी महावीर सिंह यांनी सांगितलं, की शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल.
