मुजफ्फरपूरच्या तुर्की पोलीस स्टेशन हद्दीतील छजन पसारबडा गावात जमिनीत पुरलेल्या जितू राम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. खरं तर, जितू रामचा खून त्याच्या अनैतिक संबंधामुळेच झाला होता. जितूचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते, त्याच महिलेच्या मुलाने जितूला मारले आणि त्याचा मृतदेह शेतात पुरला. सुमारे 14 दिवसांनी त्याचा मृतदेह शेतातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपी तरुणाला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
advertisement
जितू बेपत्ता होता...
या प्रकरणाबद्दल माहिती देताना मुजफ्फरपूर पश्चिमचे SDPO-2 अनिमेषचंद्र ज्ञानी म्हणाले की, जितू 7 मे पासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी 20 मे रोजी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. कुटुंबीयांनी त्याच गावातील एका महिलेवर जितूला गायब केल्याचा आरोप केला होता, कारण जितूचे त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दरम्यान, 21 मे रोजी एका शेतातून कुजलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो जितू राम असल्याचं स्पष्ट झालं.
संशयाची सुई फिरली...
पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता, महिलेचा मुलगा अविनाश संशयाच्या घेऱ्यात आला. अविनाशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्याने धक्कादायक सत्य सांगितले. त्याने सांगितले की, 7 मे रोजी रात्री जितू त्याच्या आईला भेटायला आला होता आणि याचवेळी दोघांमध्ये भांडण झाले. भांडणादरम्यान, अविनाशने जितूच्या डोक्यात काठीने मारले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर अविनाशने आपल्या आईच्या प्रियकराचा मृतदेह जवळच्याच शेतात पुरून टाकला. पण 14 दिवसांनी मृतदेह सापडल्यावर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. जितू आणि अविनाश दोघेही एकत्र मजुरीचे काम करत होते. याच काळात जितूचे अविनाशच्या आईसोबत अनैतिक संबंध जुळले. जितू विवाहित होता आणि त्याला एक मूल आहे, तर त्याची पत्नी गर्भवती आहे.
हे ही वाचा : सोलापुरात 8 वर्षांच्या चिमुरडीसोबत काय घडलं? दफन केलेला मृतदेह संशयावरून बाहेर, वडिलांनीच..
हे ही वाचा : नोकरीच्या शोधात असाल तर सावधान! 'कॉल मर्जिंग स्कॅम' तुम्हाला करेल कंगाल, सायबर तज्ञांनी दिला 'हा' इशारा!
