चंद्रमौली नागमल्लैय्या असं हत्या झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नाव आहे. ते मूळचे कर्नाटकातील रहिवासी होते. ते डलासमधील डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. बुधवारी सकाळी मोटेलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागमल्लैया यांचा त्यांचा सहकारी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ याच्याशी तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
advertisement
आरोपीनं हल्ला केल्यानंतर नागमल्लैया मोटेलच्या ऑफिसमध्ये पळत गेले, जिथे त्यांची पत्नी आणि १८ वर्षांचा मुलगा होता. मात्र, आरोपी कोबोस-मार्टिनेझने त्यांचा पाठलाग सोडला नाही. तो त्यांचा पाठलाग करत ऑफिसमध्ये घुसला. नागमल्लैया यांच्या पत्नी आणि मुलाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने त्यांचे ऐकले नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, ३७ वर्षीय कोबोस-मार्टिनेझने चाकूने नागमल्लैया यांच्यावर सपासप वार केले. त्याने नागमल्लैया यांचं शीर धडावेगळं केल्यानंतरच शांत झाला. या क्रूर हल्ल्यात नागमल्लैया यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. ह्युस्टनमध्ये त्याच्यावर वाहन चोरी आणि हल्ल्याचे आरोप आहेत. सध्या त्याला जामिनाविना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार, या गुन्ह्यात तो दोषी आढळल्यास त्याला पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.
या घटनेमुळे भारतीय समुदायामध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण आहे. कुटुंबासमोरच अशा प्रकारे क्रूर हत्या झाल्यामुळे मोठा आघात झाला आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.