Agriculture: ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीतल्या पारंपरिक शेतीचा Ground Report
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture News: सांगलीच्या घाटमाथ्यावरील आठ-दहा गावांच्या शिवारात या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. इतर गव्हाच्या तुलनेत या शेतगव्हाला दरही जास्त मिळतो.
सांगली: गहू हे रब्बी हंगामातील मुख्य तृणधान्य पीक राहिले आहे. थंड आणि कोरड्या हवामानामध्ये भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत. अशातच सांगलीच्या घाटमाथ्यावरील खानापूर तालुक्यातील भिवघाट परिसरात मात्र हवेवरचा गहू पिकवला जातो. पाण्याची अजिबात गरज नसलेला शेतगहू नेमका कसा पिकवतात? लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात घाटमाथ्यावर हवामान आणि जमिनीच्या ओलसरपणाच्या आधारे हा गहू पिकवला जातो. या भागात या बिनपाण्याच्या गव्हाला शेतगहू किंवा हवेवरचा गहू म्हणतात. या गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ जमिनीत असणाऱ्या ओलीवर येतो. "पुन्हा पाणी द्यावे लागत नसल्याने एकदा पेरल्यानंतर काढायलाच जायचे" असे स्थानिक शेतकरी सांगतात.
advertisement
घाटमाथ्यावरील आठ-दहा गावांच्या शिवारात या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. या पिकाला मध्यम स्वरूपाची जमीन लागते आणि वातावरण कोरडे आणि थंडगार असावे लागते. या दोन्ही गोष्टी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील रेणावी, रेवणगाव, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, जाधववाडी, तामखडी, अडसरवाडी वगैरे गावांमध्ये मिळते.
साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजे दसरा झाल्यानंतर या गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यांत हे पीक येते. रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. एकरी 20 किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यात एकरी 5 ते 6 क्विंटल (कधी कधी 6 ते 7 पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मीळ असल्यामुळे सध्या परंपरागत काही लोकांकडेच उपलब्ध आहे.
advertisement
खानापूर घाट माथ्यावरील आठ ते दहा गावांत मिळून सुमारे 1500 एकरांत या गव्हाचे उत्पन्न घेतले जाते. त्याला 'हवेवरचा गहू' असे म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणापेक्षा हा वेगळा असतो. त्याचा बाजारभाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत एक हजार रुपये जास्तच असतो.
या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या, तसेच आरोग्यास चांगल्या असतात. याचे बियाणे स्वतंत्रपणे या भागातील शेतकऱ्यांकडे संरक्षित केलेले आहे.
advertisement
खानापूर घाट माथ्यावरील गावांमध्ये हवेवरच्या गव्हाचे उत्पादन घेतले जाते. या गव्हाला शेतगहू असेही स्थानिक नाव आहे. याच नावाने या हवेवरच्या गहू पिकाच्या प्रजाती इथल्या लोकांनी आजवर जपल्या आहेत आणि वाढविल्या आहेत. परंतु आधुनिक शेतीच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पारंपरिक शेतगव्हाचे वाण संवर्धित होऊन त्यावर अधिक संशोधनाची गरज स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होते.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 12:49 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture: ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीतल्या पारंपरिक शेतीचा Ground Report








