जळगाव : जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात माजी महापौर आणि सध्या शिवसेना शिंदे गटाच्या जवळ असलेले ललित कोल्हे यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी 8 जणांना अटक झाली आहे. ललित कोल्हेला ९ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
advertisement
गेल्या नऊ दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले कोल्हे यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या बनावट कॉल सेंटरद्वारे अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अन्य देशांतील नागरिकांना कॉल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात होती. 28 सप्टेंबर रोजी जळगाव पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून 31 लॅपटॉप जप्त केले. तपासात समोर आले की केवळ दोन दिवसांत 67 विदेशी नागरिकांना कॉल झाले होते, तर 12 दिवसांत हे प्रमाण 650 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोज कॉल डेटा डिलिट करण्याचे आदेश होते.
लूकआउट नोटीस जारी
या प्रकरणात ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद हे तीन प्रमुख सूत्रधार अद्याप फरार असून, ते विदेशात पलायन करू नयेत म्हणून लूकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन मंत्र्यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोपही झाला असून, एका मंत्र्याने कोल्हेंना व्हीआयपी ट्रीटमेंट, तर दुसऱ्याने कठोर कारवाईसाठी पोलिसांना फोन केल्याचे बोलले जात आहे.
विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक
यामुळे तपासावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. विदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेतही मिळाले आहेत.
परदेशी नागरिकांची कशी केली फसवणूक?
जळगाव शहरापासून तीन-चार किमी अंतरावर ममूराबाद रोडवर एक फॉर्महाऊस आहे. एल. के. नावाचं फॉर्म हाऊस आहे. त्या ठिकाणी बोगस कॉल सेंटर सुरू होते. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचं बतावणी करुन परदेशी नागरिकांकडून पैसे ट्रान्सफर करुन घेतल्याचं उघडकीस आले. परदेशी नागरिकांना फसवलं जात असून रात्रीच्या वेळी हे कॉलिंगचे काम सुरू असायचे.