सुरेश तुकाराम आर्दड असं खून झालेल्या ३३ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर हरी कल्याण तौर, सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (राजाटाकळी, ता. घनसावंगी), हिनाज बावामिया सय्यद (कुंभार पिंपळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हरी कल्याण तौर हा सुरेशचा चुलत भाऊ आहे. पोलिसांना टीप दिल्याच्या कारणातून त्यानेच आपल्या भावाचं अपहरण करुन त्याच्या हत्येचा कट रचल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू तस्करीची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणातून ही हत्या झाली आहे. चुलत भावासह इतरांनी रात्रीच्या वेळी सुरेशला घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बोलावून घेतलं होतं. यानंतर तिघांनी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून सुरेशला चारचाकी वाहनात बसवून अपहरण केलं. तरुणाचा खून करून मृतदेह विदर्भातील किनगावराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडेगाव टाकरखेडा परिसरात टाकला.
दरम्यान, २९ जूनला विदर्भातील तडेगाव शिवारात एक मृतदेह दिसून आल्याने नागरिकांनी किनगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता, घनसावंगी पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या अपहरणाची नोंद आढळून आली. यानंतर हा मृतदेह सुरेशचा असल्याची ओळख पटली. वाळू तस्करीतून हे हत्याकांड घडल्याचं पोलिसांनाही संशय आहे. मृत हा वाळू उपसा करणाऱ्यांची वाहने पकडून देण्यासाठी पोलिसांना टीप देत होता. यातून चुलत भावानेच हे इतर काही जणांच्या मदतीने हे हत्याकांड घडवल्याचा संशय व्यक्त होत आहे.
कुंभार पिंपळगाव येथून ज्या वाहनाने आरोपींनी अपहरण केले होते. ते वाहन कुंभार पिंपळगावपासून जवळच असलेल्या जवसगाव परिसरात आढळून आले आहे. हे वाहन घनसावंगी पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे. मात्र, आरोपी मात्र अजूनही फरार आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
