मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपीने तीन राउंड फायर केले होते. तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकून शेजारीही तिथे पोहोचले. कुटुंबातील इतर सदस्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामा आणि मामीचा खून करणाऱ्या आरोपी भाच्याने तीन दिवसांपूर्वी त्याच्या मित्राकडून पिस्तूल आणलं होतं. आरोपीने कबुली दिली आहे की, 'माझ्या आईला त्रास देत असल्यामुळे मामाची हत्या केली. मंगळवारी रात्रीही माझा मामा माझ्या आईला खूप शिव्या देत होता. त्यामुळे मला राग आला आणि मी त्याला गोळ्या घातल्या.’
advertisement
या प्रकरणी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘घटनेच्या वेळी मृत व्यक्तीचा भाऊ जगतपाल तिथे होता. संपूर्ण घटना त्याच्या डोळ्यांसमोर घडली आहे. जगतपाल यांनी दिलेल्या तक्रारीवरूनच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमध्ये जखमी झालेल्या आरोपीच्या मामेभावावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याचाही जबाब घेतला जाणार आहे.’
नेमका काय आहे प्रकार?
लखनऊमधील तकरोही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयनगर कॉलनीतील हे प्रकरण आहे. या कॉलनीमध्ये मृत राजेंद्र सिंह हे पत्नी सरोज आणि तीन भावांसह एकाच घरात राहत होते. त्यांना एक पुष्पा नावाची बहीण असून पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती राजेंद्र सिंह यांच्याकडेच राहते. मृत व्यक्तीचा भाऊ जगतपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र दारू पिऊन घरी आला आणि त्याचा बहीण पुष्पाशी काही कारणावरून वाद झाला. त्याचवेळी पुष्पाच्या मुलाने देशी बनावटीच्या पिस्तुलातून राजेंद्र याच्यावर गोळी झाडली. त्यावेळी राजेंद्रची बायको सरोज मध्ये आल्याने तिच्यावरही आरोपीने गोळी झाडली. तसेच राजेंद्र यांच्या मुलावर देखील गोळी झाडली. या घटनेत राजेंद्र आणि सरोज यांचा मृत्यू झाला असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे.’
रोजच्या भांडणाला मी वैतागलो होतो
पोलिसांना आरोपीनं खुनाची कबुली दिली आहे. तो म्हणाला, की ‘माझा मामा दारू पिऊन नेहमी माझ्या आईला शिवीगाळ करत होता. अनेकवेळा मी त्याला असं करू नको, असं सांगितलं होतं. पण त्याला ते मान्य नव्हतं. घटनेच्या दिवशी माझा मामा दारू पिऊन घरी आला. त्याने माझ्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी माझ्या मामाला असं करू नकोस, असं सांगितलं. पण त्यानंतरही तो माझ्या आईला शिवीगाळ करत राहिला. त्यानंतर मी रागाच्याभरात त्याच्यावर गोळी झाडली. माझी मामी त्याला वाचवायला आल्यावर तिच्यावरही गोळी झाडली आणि माझ्या मामेभावावरही गोळी झाडली. कारण रोजच्या भांडणांमुळे मी वैतागलो होतो.’
लखनऊ परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.