'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, दर्शन दुगड असं गुन्हा दाखल झालेल्या ३० वर्षीय आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांचं पोस्टिंग नंदुरबार जिल्ह्यात आहे. मात्र त्यांच्यावर नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २८ वर्षीय डॉक्टर महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. लग्नाचं आमिष दाखवून दुगड यांनी आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आयपीएस अधिकारी दर्शन दुगड हे २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. त्यावेळी सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली होती. त्यावेळी पीडित तरुणी देखील एमबीबीएसचं शिक्षण घेत होती. इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण होऊन भेटीगाठी वाढल्या. याच दुगड यांनी लग्नाचं आमिष दाखवून तक्रारदार तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला आरोपीनं नागपूर येथील एका हॉटेलमध्ये लैंगिक संबंध ठेवले. त्याने आपल्या बहिणीच्या घरी घेऊन जात वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे.
मात्र दुगड हे सिव्हील सर्विसेसची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी लग्नास नकार दिला, असा महिलेचा आरोप आहे. अनेक वेळेला प्रयत्न करूनही संबंधित आयपीएस अधिकारी भेटत नाही, त्याचे कुटुंबीय ही दाद देत नाही, यामुळे निराश झालेल्या महिला डॉक्टरने नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये आयपीएस अधिकाराच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. पण एका आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
